पुणे : राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थी, शिक्षकांची उपस्थिती ऑनलाइन नोंदवण्याच्या सूचना देऊनही शाळांकडून अद्याप त्याचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ऑनलाइन उपस्थिती नोंदवण्याच्या प्रणालीच्या वापराबाबत नव्याने सूचना देण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे. मात्र, आधीच अनेक प्रकारची माहिती भरण्याचे काम शिक्षकांना करावे लागत असताना आता ऑनलाइन उपस्थिती नोंदवण्याचे नवे कामही शिक्षकांच्या माथी मारले जात असल्याबाबत शिक्षकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी उपस्थितीची ऑनलाइन नोंद करण्याबाबत संयुक्त परिपत्रकाद्वारे निर्देश दिले. यापूर्वी केंद्र शासनाने विद्या समीक्षा केंद्र प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांच्या दैनिक उपस्थितीची नोंद करण्यासाठी प्रणाली कार्यान्वित केली आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार विद्या समीक्षा केंद्र प्रणालीवर विद्यार्थी, शिक्षक नोंदणीची कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यानुसार सर्व शाळांतील शिक्षकांनी त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांची विद्या समीक्षा केंद्र प्रणालीवर शालेय कामकाजाच्या दिवसाची उपस्थिती दररोज नोंदवावी. तसेच सर्व शिक्षक, पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक यांनीही त्यांच्या उपस्थितीची नोंद या प्रणालीवर नियमितपणे करणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. विद्या समीक्षा केंद्र प्रणालीवर उपस्थिती नोंदवण्यासाठी स्वीफ्ट चॅट या ॲप्लिकेशनवर शाळेचा यू-डायस क्रमांक नोंदवून शाळेच्या माहितीची पडताळणी करून ती योग्य असल्याची खातरजमा करावी. वर्गशिक्षकांनी त्यांचा शालार्थ आयडी नोंदवून शालार्थ माहिती तपासून ती योग्य असल्याची खात्री करावी. विद्यार्थी उपस्थिती नोंदवण्यासाठी विद्यार्थी उपस्थिती टॅबद्वारे विद्यार्थी उपस्थिती, अनुपस्थिती चिन्हांकित करावी, उपस्थिती बरोबर असल्याची खातरजमा करून उपस्थिती दाखल करावी, एकापेक्षा जास्त इयत्तांना वर्गशिक्षक असल्यास दुसऱ्या इयत्तेची हजेरी चिन्हांकित करण्यासाठी विद्याथी हजेरी या टॅबवर त्या प्रमाणेच उपस्थितीची नोंद करावी.

