मुंबई : मुंबईतील घाटकोपर पूर्व येथील कामराज नगर परिसरात गणेशोत्सवाच्या उत्साहाला गालबोट लावणारी धक्कादायक घटना घडली आहे. ‘सेव्हन स्टार स्पोर्ट्स क्लब’ गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष राजेश देवेंदर यांची भररस्त्यात धारदार चाकूने छातीत वार करून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून गणेशोत्सवाच्या काळात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
प्राथमिक तपासानुसार, मंडळाच्या एका कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा जाब विचारल्याच्या रागातून आणि जुन्या वैमनस्यातून हा हल्ला करण्यात आला. १८ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास बीएमसी शाळेजवळील मंडळाचा विनय शर्मा हा कार्यकर्ता उभा असताना रौनक बाळू सोनावणे याने “रागाने का पाहिलंस?” या कारणावरून त्याला चापट मारल्याचे सांगितले जाते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंडळाचे अध्यक्ष राजेश देवेंदर यांनी रौनकला जाब विचारला. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि त्याचेच पुढे हिंसक रूपांतर झाले. वाद वाढताच रौनक सोनावणे याने आपल्या साथीदारांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यानंतर आकाश सुभाष सोनावणे, अश्विन गणेश उनवणे, श्रेयस अजय शुक्ला, बबलू आणि स्टीफन सेगल नाडर ऊर्फ अण्णा यांच्यासह इतर आरोपी घटनास्थळी पोहोचले. सर्वांनी मिळून राजेश देवेंदर यांच्याशी वाद घालत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान रौनकने खिशातून धारदार चाकू काढून राजेश यांच्या छातीत वार केला. गंभीर जखमी झालेल्या राजेश यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर त्यांना पांचोली रुग्णालयात नेण्यात आले, तेथेही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्यूची पुष्टी केली. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. त्यांना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आनंद तिवारी यांच्यावरही हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी ७ जणांविरोधात गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू केला असून, हत्येमागील नेमके कारण आणि सर्व आरोपींची भूमिका याचा अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे घाटकोपर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
