मुंबई : तब्बल १४ वर्षाच्या संघर्षपूर्ण पाठपुरावाला यश येत असून, सन २००९ मध्ये मीरा-भाईंदरवासीयांना दाखवलेले स्वप्न पूर्णत्वास येत आहे. या डिसेंबर अखेरपर्यंत दहिसर ते काशिमिरा या मार्गावर मेट्रो सुरू करण्याचे नियोजन असून, मीरा-भाईंदरवासीयांसाठी हा एक आनंद क्षण असणार आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते दहिसर ते काशिमिरा या मेट्रो मार्गाच्या पाहणी दौऱ्याच्या वेळी बोलत होते.
मंत्री सरनाईक म्हणाले की, सन २००९ मध्ये जेव्हा या भागाचा मी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो, त्यावेळी मी येथील नागरिकांना मेट्रोचे स्वप्न दाखवले होते. तत्कालीन प्रस्थापित पुढाऱ्यांनी माझ्या या घोषणेची त्यावेळी खिल्ली उडवली होती. परंतु गेल्या १४ वर्षांमध्ये सातत्याने केलेल्या पाठपुरावाला अखेर यश येताना दिसत आहे. सन २०१४ मध्ये जेव्हा युती सरकार स्थापन झाले, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यामुळे दहिसर ते काशिमिरा या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली. लवकरच हा मार्ग सुरू झाल्यानंतर मीरा-भाईंदरवासीय मेट्रोने अंधेरी पर्यंत जाऊ शकतात. तसेच तिथून मेट्रो १ चा वापर करून एअरपोर्ट स्थानक ३ मधून थेट कुलाबापर्यंत जाऊ शकतात.

