मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक आणि प्रसिद्ध दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील उद्यान गणेश मंदिराला गणेशोत्सवाच्या काळातच मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावल्याने भाविक आणि स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जी उत्तर विभागाने मंदिर परिसराची पाहणी केल्यानंतर सुरक्षेसाठी उभारण्यात आलेले बांबूचे शेड तसेच काही तात्पुरती बांधकामे अनधिकृत असल्याचे नमूद करत मंदिर ट्रस्टला कारवाईची नोटीस दिली आहे. याशिवाय मंदिराबाहेर बसणारे फुलविक्रेते आणि इतर अनधिकृत स्टॉल्समुळे पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.
महापालिकेने नोटीसमध्ये मंदिर परिसरातील अनधिकृत शेड, तात्पुरती बांधकामे आणि अतिक्रमण तातडीने हटवण्याचे निर्देश दिले असून आदेशाचे पालन न झाल्यास पालिकेकडून थेट कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. १९७० पासून शिवाजी पार्क परिसरात असलेले उद्यान गणेश मंदिर हे मुंबईतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही येथे मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत आहेत. अशा परिस्थितीत ऐन गणेशोत्सवातच नोटीस बजावण्यात आल्याने मंदिर ट्रस्ट, स्थानिक नागरिक आणि भाविकांनी आश्चर्य व्यक्त करत नाराजी दर्शवली आहे.

