बदलापूर : गणेशोत्सवादरम्यान विसर्जनावेळी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पूजा साहित्य आणि निर्माल्य टाकले जात असल्याने पाण्याचे प्रदूषण वाढते. ही समस्या लक्षात घेऊन डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने यंदाही उल्हास नदी संवर्धनासाठी विशेष निर्माल्य संकलन मोहीम राबविण्यात आली. या पर्यावरणपूरक उपक्रमाला भाविक आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवसभर चाललेल्या मोहिमेत तब्बल २,०७० किलो निर्माल्य संकलित करण्यात आले. प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी बदलापूर पूर्व येथील उल्हास नदी चौपाटी, खरवई, वांगणी येथील कुडसावरे, अंबरनाथमधील कैलास नगर तसेच उल्हासनगरमधील मानेरे गाव आदी नदीघाट आणि विसर्जनस्थळांवर निर्माल्य संकलन केंद्रे उभारली होती. या मोहिमेत सुमारे ३०० ते ३५० श्री सदस्यांनी सेवाभावी वृत्तीने सहभाग घेत नागरिकांना नदी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. “नदी ही आपली माता असून तिचे संरक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे,” असा संदेश देत सदस्यांनी नदीपात्रात निर्माल्य न टाकण्याचे आवाहन केले. प्रतिष्ठानच्या आवाहनाला प्रतिसाद देत भाविकांनी फुले, हार आणि इतर पूजा साहित्य थेट नदीत न टाकता संकलन केंद्रांवर जमा केले. या उपक्रमातून जमा झालेले २,०७० किलो निर्माल्य शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत तयार करण्यात येणार आहे. हे खत प्रतिष्ठानच्या विविध वृक्षारोपण उपक्रमांमध्ये वापरण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. घाटांवर भाविकांची मोठी गर्दी असूनही स्वयंसेवकांनी कोणताही गोंधळ न होऊ देता नियोजनबद्ध काम केले. या उपक्रमामुळे उल्हास नदीचे पावित्र्य आणि स्वच्छता जपण्यास मोठी मदत झाली असून, पर्यावरण संवर्धनासाठी समाजाने एकत्र येत केलेल्या प्रयत्नाचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

