पुणे : कैवल्य सम्राट चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मजयंतीनिमित्त आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी येथील गावठाणचा राजा, राजा शिवछत्रपती तरुण मित्र मंडळाने यंदा ‘माऊली… एक दिव्य प्रवास’ हा भव्य जिवंत देखावा साकारला आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्याच दोन दिवसांत या देखाव्याला भाविक, ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत विविध वयोगटांतील नागरिक या जिवंत देखाव्याचा अनुभव घेत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभे राहत असल्याने भाविक भारावून जात आहेत.
‘माऊली… एक दिव्य प्रवास’ या देखाव्यात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील विविध आध्यात्मिक आणि प्रेरणादायी प्रसंग जिवंत पात्रांच्या माध्यमातून सादर करण्यात आले आहेत. ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’ या भावस्पर्शी प्रसंगाचा सजीव आविष्कार, माऊलींच्या पाठीवर मांडे भाजण्याचा प्रसंग, ‘रेड्या मुखी चार वेद बोलावले’ हा ज्ञानशक्ती आणि आध्यात्मिक सामर्थ्याचा प्रसंग, निर्जीव भिंत चालवण्याचा प्रसिद्ध प्रसंग, चांगदेवांचे गर्वहरण तसेच माऊलींची संजीवन समाधी असे सहा प्रसंग देखाव्यात साकारण्यात आले आहेत. यातील संजीवन समाधी सोहळा हा देखाव्याचा भावनिक उत्कर्षबिंदू असून, तो भाविकांच्या मनाला स्पर्श करून जात आहे. हा देखावा साकारण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुमारे दोन महिन्यांपासून मेहनत, नियोजन आणि सराव केला आहे. देखाव्यातील प्रत्येक प्रसंग प्रभावीपणे साकारण्यासाठी लहान-मोठ्या सर्व कार्यकर्त्यांनी जिवंत पात्रांच्या भूमिका स्वीकारल्या आहेत. वेशभूषा, रंगभूषा, संवाद, अभिनय, नेपथ्य, प्रकाशयोजना, ध्वनीव्यवस्था आणि प्रसंगांची मांडणी यांचा बारकाईने विचार करून देखावा उभारण्यात आला आहे. मंडळातील कार्यकर्त्यांनी स्वतः विविध भूमिका साकारत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनाचा दिव्य प्रवास भाविकांसमोर उभा केला आहे. गावठाणचा राजा, राजा शिवछत्रपती तरुण मित्र मंडळाची ५२ वर्षांची परंपरा आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांच्या माध्यमातून मंडळाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून दरवर्षी समाजप्रबोधन, संस्कृती आणि इतिहासाशी नाते जोडणारे विविध उपक्रम राबविले जातात. याच परंपरेला पुढे नेत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मजयंतीचे औचित्य साधून यंदा ‘माऊली… एक दिव्य प्रवास’ हा जिवंत देखावा सादर करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभागाचे समन्वयक एस. जी. पाटील यांनी मंडळाच्या जिवंत देखाव्यास सदिच्छा भेट देऊन पाहणी केली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातील प्रसंग जिवंत स्वरूपात सादर करण्याची संकल्पना, कार्यकर्त्यांचे नियोजन, अभिनय आणि सादरीकरणाचे त्यांनी कौतुक केले. देखावा उभारण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबतच पिंपळगाव खडकी ग्रामस्थांचाही मोठा पाठिंबा मिळत आहे. गावातील नागरिक, तरुणाई, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विविध स्तरांतील भाविक या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने भक्ती, इतिहास, संतपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा यांचा संगम साधणारा हा जिवंत देखावा सध्या पिंपळगाव खडकी परिसरातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. ‘माऊली… एक दिव्य प्रवास’च्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार, कार्य आणि भक्ती-ज्ञानाची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा मंडळाचा प्रयत्न सुरू आहे.
