ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरात महाराष्ट्रातील पहिली प्रीपेड रिक्षा सेवा अधिकृतपणे सुरू करण्यात आली असून, प्रवाशांसाठी ही मोठी दिलासादायक सुविधा ठरणार आहे. या सेवेमुळे रिक्षात बसण्यापूर्वीच प्रवासाचे अधिकृत आणि निश्चित भाडे समजणार असल्याने भाड्यावरून होणारे वाद, घासाघीस आणि रिक्षाचालकांची मनमानी याला मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे. या प्रीपेड व्यवस्थेअंतर्गत प्रवाशांनी काउंटरवर जाऊन इच्छित स्थळाचा पत्ता सांगायचा असून, त्यानुसार अधिकृत भाडे निश्चित केले जाईल. त्यानंतर प्रवाशांना डिजिटल पावती दिली जाईल. या पावतीवर रिक्षा क्रमांक, चालकाचे नाव, मोबाईल क्रमांक आणि प्रवासाचे निश्चित भाडे नमूद असेल. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह ठरणार आहे. संपूर्ण व्यवस्थेचे तांत्रिक संचालन सिटीफ्लो या कंपनीमार्फत करण्यात येत असून, रिक्षाचालकांच्या दिवसाभराच्या कमाईचा हिशोब थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यामुळे व्यवहारात पारदर्शकता वाढण्यास आणि चालकांनाही उत्पन्नाचे नियोजन करण्यास मदत होणार आहे.
हा उपक्रम स्व. वसंतराव डावखरे रिक्षा-टॅक्सी चालक-मालक महासंघ आणि ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला आहे. आमदार निरंजन डावखरे आणि संजय केळकर यांच्या पाठपुराव्यानंतर या योजनेला मंजुरी मिळाली. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूला सॅटीस (SATIS) पुलाखाली या सेवेचा अधिकृत प्रीपेड रिक्षा काउंटर उभारण्यात आला आहे. प्रवाशांनी या काउंटरवर जाऊन गंतव्यस्थानाची माहिती द्यायची, त्यानुसार अधिकृत भाड्याची डिजिटल पावती घ्यायची आणि त्यावर नमूद केलेल्या रिक्षेतून प्रवास सुरू करायचा आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना पारदर्शक, सुरक्षित आणि त्रासमुक्त प्रवासाचा अनुभव मिळणार असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. भविष्यात राज्यातील इतर प्रमुख रेल्वे स्थानकांवरही अशी सेवा सुरू करण्याचा मार्ग या उपक्रमामुळे मोकळा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
