नवी दिल्ली : दिल्ली स्फोटात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगतानाच या स्फोटाचे कारस्थान रचणाऱ्यांना सोडणार नाही. त्यांना शिक्षा होणारच, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्फोटासाठी जबाबदार असलेल्यांना ठणकावले आहे. आमच्या तपास यंत्रणा स्फोट घडवणाऱ्यांचे पाळेमुळे खणून काढणार आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे मोदींनी म्हटले आहे. भूतानमध्ये जागतिक शांतता प्रार्थना महोत्सव आणि भूतानच्या चौथ्या राजाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते. भूतानच्या जागतिक शांतता प्रार्थना महोत्सवात भारत सहभागी झाला आहे. जगभरातून आलेले संत सोबतच जगाच्या शांततेची प्रार्थना करतायत. त्यात १४० कोटी भारतीयांच्याही प्रार्थना आहेत, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आजचा दिवस भूतानसाठी, इथल्या राजघराण्यासाठी, जागतिक शांततेवर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. अनेक शतकांपासून भारत आणि भूतानचे संबंध जवळचे राहिले आहेत. सांस्कृतिक नातेही या दोन्ही देशामध्ये आहे, या महत्त्वाच्या कार्यक्रमात सहभागी होईन, असे मी सांगितल्याने इथे उपस्थित राहिलो असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मी आज भूतानमध्ये जड अंत:करणाने आलो आहे. सोमवारी संध्याकाळी दिल्लीत झालेल्या स्फोटामुळे सगळेच व्यथित झाले आहेत. मी पीडित कुटुंबीयांचे दु:ख समजू शकतो. आज संपूर्ण देश त्यांच्यासोबत उभा आहे. मी रात्रभर सर्व सुरक्षा यंत्रणांच्या संपर्कात होतो. स्फोटाचा सखोल तपास केला जाईल. आमच्या सुरक्षा यंत्रणा षडयंत्राच्या मुळापर्यंत जातील. स्फोट घडवणाऱ्यांना सोडणार नाही, त्यांना शिक्षा होणारच. स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी आहोत, असे ते म्हणाले. मोदींनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्टपणे म्हटले नसले तरी दिल्लीतील स्फोटाचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे समोर येत आहे. स्फोट घडवणाऱ्यांना शिक्षा होणारच, असे म्हणत मोदींनी अप्रत्यक्षपणे दहशतवादी संघटना आणि अशा संघटनांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला इशाराच दिला आहे.

