वृत्तसंस्था : ऑन-डिमांड फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगीने ग्राहकांसाठी मोठी सुविधा सुरू केली आहे. कंपनीने आपल्या अॅपवर ‘मल्टी रेस्टॉरंट ऑर्डरिंग’ हे नवे फीचर लॉन्च केले असून, आता ग्राहकांना एकाच ऑर्डरमध्ये पाच वेगवेगळ्या रेस्टॉरंटमधून आवडीचे पदार्थ मागवता येणार आहेत. कुटुंबातील किंवा मित्रमंडळींच्या वेगवेगळ्या खाद्यपसंती लक्षात घेऊन ही सुविधा विकसित करण्यात आली आहे. यामुळे वेगवेगळ्या रेस्टॉरंटमधून स्वतंत्र ऑर्डर देण्याची गरज राहणार नाही. एकाच चेकआउट आणि एकाच पेमेंटद्वारे सर्व ऑर्डर पूर्ण करता येतील. त्यामुळे प्लॅटफॉर्म शुल्काची बचत होण्याबरोबरच ऑर्डर देण्याची प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे.
ग्राहक आता बिर्याणी, पिझ्झा, सुशी, स्ट्रीट फूड, डेझर्ट्स किंवा इतर कोणतेही पदार्थ वेगवेगळ्या रेस्टॉरंटमधून निवडून एकाच वेळी मागवू शकतात. प्रत्येक रेस्टॉरंटची ऑर्डर स्वतंत्रपणे तयार व वितरित केली जाईल, मात्र सर्व ऑर्डरचा मागोवा एका सामायिक ट्रॅकिंग स्क्रीनवर घेता येईल. स्विगीच्या माहितीनुसार, ग्राहकांच्या वापराच्या सवयींचा अभ्यास केल्यानंतर हे फीचर विकसित करण्यात आले आहे. संशोधनात ५५ टक्के ग्राहक एकाच सत्रात दोन कार्ट तयार करतात, तर प्रत्येक पाचपैकी एक ग्राहक पहिल्या ऑर्डरनंतर ३० मिनिटांत दुसरी ऑर्डर देतो, असे आढळले. हे लक्षात घेऊन विकसित करण्यात आलेले हे फीचर सध्या देशातील ७२० हून अधिक शहरांमध्ये उपलब्ध करण्यात आले असून, सणासुदीच्या काळात कुटुंब आणि मित्रांसोबतच्या जेवणाचा अनुभव अधिक सोयीस्कर आणि आनंददायी करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
