वृत्तसंस्था : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा प्रभाव आता मराठी चित्रपटसृष्टीतही दिसू लागला आहे. एआयच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला ‘बागुलबुवा’ हा मराठीतील पहिलाच चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात प्रत्यक्ष कलाकारांच्या अभिनयासोबत एआय तंत्रज्ञानाचा वापर करून एक वेगळा आणि भव्य सिनेमॅटिक अनुभव साकारण्यात आला आहे. एसएस फिल्म्स प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाचे निर्माते शरद पाटील आणि अंजली पाटील आहेत. अभिनेता-दिग्दर्शक चेतन चावडा यांनी चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन केले असून, पटकथा नितीन चव्हाण, संकलन विनोद राजे, व्हीएफएक्स अथर्व चव्हाण आणि स्टोरीबोर्ड आकाश पांडे यांनी सांभाळला आहे. चित्रपटातील एआय तंत्रज्ञानाची जबाबदारी मेटाफेक्स प्रोडक्शनने पार पाडली आहे. अभिजीत खांडकेकर प्रमुख भूमिकेत दिसणार असून, अन्य ५५ कलाकारांची नावे अद्याप गुप्त ठेवण्यात आली आहेत.
चित्रपटाचा टायटल टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून, त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हॉलीवूड शैलीची झलक असलेल्या या टीझरमध्ये पुणे आणि परिसरात घडणारी रहस्यमय कथा दाखवण्यात आली आहे. एका गूढ संकटामुळे लोकांच्या डोळ्यांवर परिणाम होतो आणि ‘बागुलबुवा’ नेमका काय आहे, याचा उलगडा चित्रपटातून होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून मराठी चित्रपटांची भव्यता वाढवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. एआयच्या साहाय्याने तयार झालेल्या दृश्यांबरोबरच आणखी काही विशेष सरप्राइजेसही चित्रपटात असणार असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. त्यामुळे ‘बागुलबुवा’ हा मराठी चित्रपटसृष्टीतील तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचा टप्पा ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

