अकोला : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील कथित मतदान घोटाळ्याच्या मुद्द्यावर वंचित बहुजन आघाडीने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी २८ ऑक्टोबर रोजी मुंबईत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा केली. अकोला येथील यशवंत निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, निवडणुकीनंतर सुमारे ७६ लाख मतदानाच्या आकडेवारीबाबत माहिती देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, ती अद्याप पूर्ण न झाल्याने हा लढा सुरू असून आता या प्रकरणातील कथित जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. कसारा, कर्जत आणि रायगड परिसरातील कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर या मोर्चाचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकाश आंबेडकर यांनी आरोप केला की, मतदार यादीतून नावे वगळल्यानंतर संबंधित नागरिकांना फॉर्म ६ भरताना शपथपत्र (अॅफिडेव्हिट) देण्यास भाग पाडले जात आहे. आधीच मतदार असलेल्या व्यक्तींनी असे शपथपत्र दिल्यास त्यांनी यापूर्वी मतदार नसल्याचे जाहीर करावे लागते, त्यामुळे त्यांच्यावर खोटे प्रतिज्ञापत्र दिल्याचा फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त नागरिकांना गुन्हेगार बनविण्यास भाग पाडत असल्याचा आरोप करत राष्ट्रपतींकडे त्यांच्या विरोधात फौजदारी कारवाईसाठी परवानगी देण्याची मागणी मोर्चातून करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या मोर्चात डावे पक्ष, समाजवादी पक्ष, विद्यार्थी संघटना आणि आदिवासी संघटनांनाही सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. मुंबईतील राणी मैदानातून सुरू होणारा हा शांततापूर्ण मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरापर्यंत जाणार असून, ७६ लाख मतदानाच्या मुद्द्याकडे पुन्हा जनतेचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही आंबेडकर यांनी सांगितले.
