नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रित ई-२० इंधन लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात सामाजिक कार्यकर्ते तहसीन पूनावाला यांनी जनआंदोलनाची घोषणा केली असून या विषयावर राजकीय वातावरण तापले आहे. नीट पेपरफुटी प्रकरणानंतर सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन मोहिमेच्या धर्तीवर आता ‘ई-२० जनता पार्टी’ आणि पूनावाला यांच्या ‘टीम भारत’कडून ई-२० धोरणाविरोधात मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत आज दिल्लीत वाहन मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारत आंदोलन केल्यास वाहनांसह आंदोलकांना ताब्यात घेण्याचा इशारा दिल्याचा दावा करण्यात आला. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव हा मोर्चा स्थगित करण्यात आला. यानंतर तहसीन पूनावाला यांनी आज सकाळी ए.पी.जे. अब्दुल कलाम रोड ते गांधी स्मृतीपर्यंत एकट्याने पदयात्रा काढून त्यानंतर एकदिवसीय मौनव्रत आणि उपोषण करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये आरोप केला की, आंदोलनाची माहिती देण्यासाठी माध्यमांशी संवाद साधत असताना दोन आयपीएस अधिकाऱ्यांना पाठवून आपल्याला बोलण्यापासून रोखण्यात आले. तसेच दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने आंदोलन करू नये, अन्यथा आंदोलकांना आणि त्यांच्या वाहनांना ताब्यात घेतले जाईल, असा इशारा दिल्याचा दावाही त्यांनी केला. दरम्यान, त्यांच्या भाऊ शहजाद पूनावाला यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची चर्चा असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि हरदीप सिंह पुरी यांना मंत्रिमंडळातून हटविण्याची मागणीही काही संघटनांकडून करण्यात येत आहे.
तहसीन पूनावाला यांनी सरकारने ई-२० इंधन धोरणाचा पुनर्विचार करून इथेनॉलमुक्त सामान्य पेट्रोल उपलब्ध करून द्यावे आणि त्याचे दर कमी करावेत, अशी मागणी केली आहे. केंद्र सरकारने देशभरात पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचे धोरण लागू केले असून ई-२० इंधनामध्ये ८० टक्के पेट्रोल आणि २० टक्के इथेनॉलचा समावेश असतो. या धोरणामुळे विशेषतः जुन्या वाहनांमध्ये हार्ड स्टार्ट, इंजिनचा आवाज वाढणे, काही सुट्या भागांची झीज तसेच रबर, प्लास्टिक आणि धातूच्या भागांवर परिणाम होण्याच्या तक्रारी काही वाहनधारकांकडून करण्यात येत आहेत. तसेच इथेनॉलची ऊर्जा पेट्रोलपेक्षा कमी असल्याने वाहनांचे मायलेज कमी होण्याची शक्यता असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. सरकार या सर्व आक्षेपांशी सहमत नसले तरी या विषयावर समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. काही नागरिकांनी इथेनॉलमुक्त पेट्रोलचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी केली असून हजारो वाहनधारक आणि विविध संघटनांनी पोस्ट, व्हिडिओ आणि इतर माध्यमांतून आपला विरोध नोंदविला आहे. दरम्यान, ‘ई-२० जनता पार्टी’शी संबंधित इन्स्टाग्राम खाते आंदोलनाच्या एक दिवस आधी निलंबित करण्यात आल्यानेही वाद निर्माण झाला आहे. या कारवाईमागील कारण स्पष्ट करण्यात आलेले नसल्याने विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. ई-२० धोरणाविरोधात आम आदमी पक्ष, काँग्रेस तसेच दिल्ली टॅक्सी अँड टुरिस्ट ट्रान्सपोर्ट अँड टूर ऑपरेटर्स असोसिएशननेही भूमिका घेतली असून ४ ऑगस्ट रोजी मोर्चाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा मुद्दा आता केवळ इंधन धोरणापुरता मर्यादित न राहता सामाजिक, राजकीय आणि सार्वजनिक चर्चेचा विषय बनला आहे.

