ठाणे : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने ‘माझी वसुंधरा’ उपक्रमांतर्गत पर्यावरण दक्षता मंडळ आणि एन्व्हायरो व्हिजील यांच्या संयुक्त विद्यमाने ‘माझे घर, माझा बाप्पा’ या अभिनव उपक्रमांतर्गत विनामूल्य पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा आणि जनजागृती कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमाद्वारे नागरिकांना शाडू मातीपासून स्वतःच्या हाताने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असून, पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात येणार आहे. हा उपक्रम ठाणे महापालिकेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव मोहिमेचा महत्त्वाचा भाग असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यास हातभार लावावा, असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. या कार्यशाळेमुळे पारंपरिक शाडू मातीच्या मूर्तींचा वापर वाढण्यास प्रोत्साहन मिळेल तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे पर्यावरणीय नुकसान कमी करण्यास मदत होईल, असा विश्वास महापालिकेने व्यक्त केला आहे.
ऑगस्ट महिन्यातील प्रत्येक शनिवार आणि रविवारी ही कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून, ठिकाण टीएमसी शाळा क्र. १९-२०, नौपाडा, ठाणे येथे सकाळी १० ते दुपारी १ आणि दुपारी २ ते सायंकाळी ५ अशा दोन सत्रांमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी इच्छुक नागरिकांनी महापालिकेने उपलब्ध करून दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून नोंदणी करावी. सहभागी होताना दोन लहान आकाराचे कागद, जुनी वृत्तपत्रे किंवा दोन टिश्यू पेपर, मूर्ती कोरण्यासाठी कार्डबोर्ड किंवा कोणतेही हार्डबोर्ड, २० x २० सेंटीमीटर आकाराचा एक पाट आणि एक वाटी स्वतःसोबत आणणे आवश्यक आहे. ठाणे महानगरपालिकेने सर्व नागरिक, विद्यार्थी, पालक आणि गणेशभक्तांना या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले असून, स्वतःच्या हाताने शाडू मातीची गणेशमूर्ती तयार करून “माझे घर, माझा बाप्पा – श्रद्धा, संस्कार आणि आनंदाचा संगम” ही संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाबरोबरच भावी पिढीमध्ये पर्यावरणपूरक सण साजरे करण्याची जाणीव आणि सामाजिक जबाबदारी अधिक दृढ करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.
