पुणे : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली. या घटनेनंतर महायुती सरकार विरोधात राज्यभरात महाविकास आघाडीकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान आज अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या नेतृत्त्वाखाली पुणे शहरातील एसएसपीएमएस कॉलेजच्या मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ बसून मूक आंदोलन करण्यात आले. राजे आम्हाला माफ करा..! , राजे तुम्ही ३५० वर्षांपूर्वी बांधलेले किल्ले शाबूत आहेत पण आत्ताचे पुतळे…! निष्क्रिय शासकीय यंत्रणांचा धिक्कार असो! या आशयाचे मजकूर असलेले फलक घेऊन कार्यकर्ते मूक आंदोलनात सहभागी झाले होते.
यावेळी दीपक मानकर म्हणाले की, मागील आठ महिन्यापुर्वी मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला होता. पण तीन दिवसांपूर्वी पुतळा कोसळण्याची घटना घडली आहे. यामुळे माझ्यासह देशभरातील सर्व शिवशक्तच्या मनात तीव्र नाराजी आणि दुसर्या बाजूला संताप व्यक्त होत आहे. साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले किल्ले आज देखील सुस्थिती आहे. पण आठ महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारलेला पुतळा कोसळतो. यावरून त्या कामाबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहे. तसेच आम्ही सरकारमध्ये असलो, तरी छत्रपती शिवाजी महाराज हे आमची पहिली अस्मिता आहे. त्यामुळे आम्ही आज मूक आंदोलन करित आहोत, आता राज्य सरकार यापुढील काळात पुतळा उभारताना विशेष काळजी घ्यावी, अशी मागणी करीत असल्याचे त्यांनी सांगितले.