ठाणे : उल्हासनगर महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांवर विनयभंगाप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी याप्रकरणी खुलासा केला असून शहरातील जाहिरात घोटाळ्यातील कारवाई रोखण्यासाठी हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे लेंगरेकर यांनी सांगितले आहे. या प्रकारानंतर पालिकेत एकच खळबळ उडाली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. उल्हासनगर महापालिकेत कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या महिलेने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जून २०२३ मध्ये लेंगरेकर यांनी आपल्या दालनात बोलवून लगट करत विनयभंग केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
एप्रिल २०२२ ते जुलै २०२३ या काळात वेळोवेळी लेंगरेकर यांनी फिर्यादी यांना बोलून त्यांना मानसिक त्रास दिल्याचा आरोप आहे. तसेच गेल्या सहा महिन्यापासून वेगवेगळ्या विभागात बदली करून मानसिक त्रास दिल्याचाही आरोप महिलेने केला आहे. वडिलांच्या आजारपणामुळे गुन्हा दाखल करण्यास उशिर झाल्याचे फिर्यादींनी तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर उल्हासनगर महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर लेंगरेकर यांनी आयुक्त यांना लेखी स्पष्टीकरण दिले आहे. संबंधित लिपिक महिला यांनी मालमत्ता विभागांतर्गत जाहिरात परवाना कामकाज करताना मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि गैरव्यवहार केला आहे, असा आरोप त्या खुलाशात लेंगरेकर यांनी केला आहे. याबाबत तत्कालीन आयुक्तांची मान्यता घेऊन लेखा परिक्षण करण्याबाबत कार्यवाही सुरु आहे. तसेच त्यांनी पंचशील जाहिरात संस्थेला अवाजवी लाभ मिळवून देण्यासाठी आपल्या पदाचा दुरुपयोग केला असल्याचे अभिलेखावरुन आणि त्यांच्या कामकाजावरुन दिसून आल्याने त्यांच्याबाबतीत प्रशासकीय कारवाई होणार हे लक्षात आल्याने त्यांनी माझ्याबद्दल आयुक्तांकडे, महिला तक्रार निवारण समितीकडे तक्रार केली होती, असेही लेंगरेकर त्यांनी खुलाशात म्हटले आहे.
तसेच फिर्यादी महिला आणि पंचशील जाहिरात संस्थेला पुन्हा जाहिरात परवान्याचे काम देण्यासाठी दबाव टाकत होते, असाही आरोप खुलाशात केला आहे. संबंधित जाहिरात संस्थेने परवानगीच्या दुप्पट जाहिराती लावल्याचा आरोप आहे. यात पालिकेचा महसूल आणि कर बुडाल्याचा संशय पालिकेला आहे. घाटकोपर येथील होडींग दुर्घटनेनंतर शासनाच्या आदेशानुसार उल्हासनगर महापालिकेने अनधिकृत होर्डीगची तपासणी केली असता पंचशील यांच्या सर्वात जास्त अनधिकृत होर्डीग होत्या, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. त्यांच्यावर निष्कासनाची कारवाई आणि ३ गुन्हेही दाखल करण्यात आले. यात पंचशील जाहिरात संस्थेला लाभ मिळेल अशा संचिका तयार करून सादर केल्याचा आरोपही संबंधित फिर्यादींवर आहे. याप्रकरणात कारवाई होण्याच्या भितीने हा गुन्हा दाखल केल्याचा आरोप लेंगरेकर यांनी केला आहे. असा गुन्हा दाखल होणार अशी शक्यता असल्याने लेंगरेकर यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तसे पत्रही दिले होते.