मुंबई : मुंबई महापालिकेने थकीत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता कर थकबाकी भरण्यासाठी ३१ मार्चपर्यंत दिलेली मुदत वाढवून २५ मेपर्यंत केली आहे. मात्र या मुदतीपूर्वी मालमत्ता कर थकबाकी भरून दंडात्मक कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिकेने मालमत्ता कर थकबाकीदार यांना केले आहे. मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचे एक प्रमुख स्त्रोत असलेल्या मालमत्ता कराची थकबाकी ३१ मार्चपर्यंत भरण्यासाठी मुदत दिली होती. मात्र या मुदतीपर्यंत शंभर टक्के मालमत्ता करधारकांनी आपला मालमत्ता कर भरलेला नव्हता. वास्तविक, महापालिकेने सरलेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता करापोटी ६ हजार कोटी रुपयांची वसुली करण्याचे अंदाजित लक्ष्य ठरवले होते. मात्र नंतर ते लक्ष्य ४,५०० कोटी रुपये एवढे निश्चित करण्यात आले होते. मात्र पालिकेला सरलेल्या आर्थिक वर्षात ३,१९५ कोटी ९१ लाख ११ हजार रुपयांची कर वसुली करणे शक्य झाले आहे.
मात्र दुसरीकडे मालमत्ता कर वसुलीत १,३०५ कोटी रुपये घट झाली आहे.त्यामुळे आता कर निर्धारण व संकलन खात्याने कोट्यवधी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी २५ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मुदतीपूर्वी मालमत्ता करधारकांनी आपली कर थकबाकी त्वरित भरून दंडात्मक कारवाई मधून आपली सुटका करून घ्यावी, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने कर वसूली करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. विभागीय स्तरावर कार्यालयीन दिवशी तसेच सुट्टीच्या दिवशी करदात्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन करवसुलीचे कामकाज सुरु आहे. समाज माध्यमांद्वारे संपर्क करुन तसेच गृहनिर्माण संस्थेतील सदनिकानिहाय करवसुलीचे कामकाज कार्यरत आहे. मालमत्ताधारकांना करभरणा करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने मुंबई महापालिकेच्या वतीने विविध माध्यमांतून जनजागृती तसेच आवाहन करण्यात आले आहे. तथापि, अद्यापही करभरणा न केलेल्या मालमत्ताधारकांनी वेळीच कर जमा करुन दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
कर भरण्यासाठी ५ एप्रिलपर्यंत पाठपुरावा केलेल्या ‘टॉप टेन’ मालमत्ताधारकांची यादी
• ओम ओमेगा शेल्टर (जी/दक्षिण विभाग)- २० कोटी ४६ लाख ६९ हजार ५४५ रुपये
• शिवालिक व्हेंचर्स प्रा. लि (एच/पूर्व विभाग)- १२ कोटी २८ लाख ९८ हजार १६ रुपये
• गोल्डन टोबॅको (के/पश्चिम विभाग)- ११ कोटी ८४ लाख ८९ हजार ९८८ रुपये
• द वेस्टर्न इंडिया (जी/उत्तर विभाग)- ९ कोटी २१ लाख ४० हजार ४२५ रुपये
• समर्थ सिद्धार्थ शॉपिंग सेंटर ( पी/दक्षिण विभाग)- ६ कोटी ३७ लाख ५० हजार ५ रुपये
• एम. बी. जुहूकर ( के/पूर्व विभाग)- ५ कोटी ५२ लाख ३० हजार ५०५ रुपये
• सुनील कन्स्ट्रक्शन (आर/मध्य विभाग)- ३ कोटी ९ लाख ३३ हजार ६४४ रुपये
• द ट्रस्टी शरद एन (एम/पूर्व विभाग)- २ कोटी ३५ लाख ८४ हजार ४४० रुपये
• अतुल प्रोजेक्ट इंडिया प्रा. लि. (टी विभाग)- २ कोटी २२ लाख ५६ हजार ७२९ रुपये