ठाणे : कल्याण स्थानकातून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या फलाटावर जिथे थांबणे अपेक्षित असते, तिथे त्या अनेकदा थांबत नाहीत. इंडिकेटरवर दाखवलेल्या जागी बोगी येत नसल्याने प्रवाशांची धावपळ होते. असाच एक प्रकार कल्याण स्थानकात घडला. अशा धावपळीत एका प्रवासी महिलेने एक्स्प्रेसची साखळी ओढल्याने या महिलेला गाडीतून उतरवण्यात आले. यावेळी तिने गोंधळ घातल्याने तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईहून उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या एलटीटी गोरखपूर एक्स्प्रेसने जाण्यासाठी एक महिला आई-वडील आणि दोन मुलांसह निघाली होती. इंडिकेटरवर दाखवलेल्या ठिकाणी हे कुटुंब थांबले होते. मात्र, प्रत्यक्षात गाडीची बोगी मागे राहिल्याने ते सर्वजण सामान घेऊन पळाले. मात्र, गाडी सुटण्याच्या भीतीने महिलेने दीड वर्षांच्या मुलाला कडेवर घेऊन समोर दिसेल, त्या बोगीत प्रवेश केला, तर तिचे वडील तिच्या तीन वर्षांच्या मुलीला घेऊन बोगीपर्यत धावत गेले. ते गाडीत चढले किंवा नाही हे कळण्याआधीच गाडी सुटल्याने ती घाबरली आणि तिने गाडीची साखळी ओढली. यामुळे गाडी थांबल्याने आरपीएफ आणि रेल्वे पोलिस बोगीत दाखल झाले.
साखळी ओढल्याने लोकल विलंबचा ठपका ठेवत या महिलेला खाली उतरवण्यात आले. मात्र, वडील आणि मुलगी गाडीतच राहिली. यानंतर या महिलेने त्यांना गाडीतून उतरवण्याची मागणी केली. मात्र, पोलिस त्याकडे लक्ष देत नसल्याने तिने स्थानकात वाद घालत गोंधळ घातला. यामुळे पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. यादरम्यान या महिलेने वडिलांशी संपर्क करत, त्यांना कसारा स्थानकात उतरण्यास सांगितले. आता पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला असला, तरी रेल्वे प्रशासनाच्या चुकीमुळे आपले हजारो रुपयाचे वातानुकुलीत प्रवासाचे तिकीट वाया गेल्याने झालेला भुर्दंड कोण भरून देणार, असा प्रश्न या महिलेने केला आहे.