ठाणे : कल्याण डोंबिवली पालिकेच्या शाळेच्या आरक्षित भूखंडावर कल्याण पूर्वेत आडिवली ढोकळी गावात स्थानिकांनी चार माळ्याची तीस सदनिका असलेली बेकायदा इमारत उभारली होती. याप्रकरणी तक्रारी प्राप्त होताच, आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी तोडकाम पथकाच्या साहाय्याने मागील पाच दिवसांच्या काळात आरक्षित भूखंडावरील बेकायदा इमारत भुईसपाट केली. कल्याण पूर्वेतील आय प्रभागात भुईसपाट करण्यात आलेली ही सातवी टोलेजंग बेकायदा इमारत आहे. या प्रभागात गेल्या वर्षभराच्या कालावधीत शंभरहून अधिक चाळी, व्यापारी गाळे साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी राजकीय दबाव झुगारून, भूमाफियांच्या विरोधाला न जुमानता तोडून टाकले आहेत. कल्याण पूर्वेतील आय प्रभागात आडिवली ढोकळी गावात पालिकेचे शाळेचे आरक्षण असलेल्या भूखंडावर भूमाफियांनी चार माळ्याची बेकायदा इमारत बांधून पूर्ण केली होती. आयक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी पालिकेच्या आरक्षित भूखंडावरील रहिवास नसलेल्या बेकायदा इमारती तोडून टाकण्याच्या सूचना साहाय्यक आयुक्तांना केल्या आहेत.
आडिवली ढोकळीत शाळेच्या आरक्षित भूखंडावर बेकायदा इमारत उभारल्याच्या तक्रारी आय प्रभागात दाखल झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी नगररचना विभागाकडून या भूखंडासंदर्भात माहिती मागवली. त्यावेळी संबंधित भूखंड पालिकेच्या ताब्यातील आणि त्याच्यावर शाळेचे आरक्षण असल्याचे स्पष्ट झाले. पालिकेचा आरक्षित भूखंड हडप केल्याने मुंबरकर यांनी इमारत तोडण्याची विहित प्रक्रिया पार पाडून आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, अतिक्रमणचे नियंत्रण विभागाचे उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या आठवड्यापासून ही बेकायदा इमारत तोडकाम पथक, जेसीबाच्या साह्याने पोलीस बंदोबस्तात तोडण्यास सुरूवात केली होती. मागील चार दिवसाच्या कालावधीत इमारतीचे सज्जे, गच्ची तोडून झाल्यानंतर या इमारतीच्या चारही बाजुला जेसीबीच्या साहाय्याने छिद्र पाडून ही इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे भुईसपाट करण्यात आली.आडिवलीतील शाळेच्या आरक्षणावरील बेकायदा इमारत जमीनदोस्त करण्यात आल्याने परिसरातील सोसायट्यांमधील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. “आय प्रभागात बेकायदा बांधकामांवर सतत करावाई सुरू असल्याने या भागातील बेकायदा बांधकामे उभारणीची कामे बंद आहेत”