मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBSHSE) वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज, २ मे २०२६ रोजी जाहीर होणार आहे. राज्य मंडळाने अधिकृतपणे याची घोषणा केल्याने लाखो विद्यार्थ्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. पुण्यातील राज्य मंडळाच्या मुख्यालयात सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असून, या परिषदेत राज्याचा एकूण निकाल, विभागनिहाय टक्केवारी तसेच मुला-मुलींच्या निकालाची सविस्तर आकडेवारी जाहीर केली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून निकालाच्या तारखेबाबत सोशल मीडियावर विविध अफवा पसरत होत्या, मात्र आज बोर्डाकडून अधिकृत घोषणा करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
विद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला ‘सीट नंबर’ आणि ‘आईचे नाव’ प्रविष्ट करावे लागेल. निकाल पाहण्यासाठी मंडळाने दोन अधिकृत संकेतस्थळे उपलब्ध करून दिली आहेत. त्यामध्ये ‘mahresult.nic.in’ आणि ‘hscresult.mkcl.org’ या संकेतस्थळांचा समावेश आहे. निकाल पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याची प्रिंटआऊट किंवा स्क्रीनशॉट काढून सुरक्षित ठेवावा, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे. यंदाची बारावीची परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर पार पडली होती. आता विद्यार्थ्यांसह पालकांनाही निकालाची उत्सुकता लागून राहिली असून, आज अखेर त्यांची प्रतीक्षा संपणार आहे.
निकाल कसा पाहाल?
१. वरीलपैकी कोणत्याही अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
२. ‘HSC Examination Result 2026’ या लिंकवर क्लिक करा.
३. तुमचा रोल नंबर (Seat Number) आणि आईचे नाव प्रविष्ट करा.
४. ‘View Result’ बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

