मुंबई : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका स्टँडअप शोमधील कथित आक्षेपार्ह वक्तव्यांप्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलने स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरे आणि इतर संबंधितांविरोधात गुन्हा नोंदविला आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया माध्यमांवर प्रसारित झालेल्या काही व्हिडिओ क्लिप्समध्ये मृतदेहांचा संदर्भ देत तसेच महिलांविषयी कथित अवमानकारक आशयाचे विनोद करण्यात आल्याची दखल घेण्यात आली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या व्हिडिओंमधील मजकूर सार्वजनिक नैतिकता, सामाजिक मूल्ये आणि कायद्याच्या निकषांशी विसंगत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे. प्रकरणातील दोन व्हिडिओ विशेषतः चर्चेत आले असून त्यातील वक्तव्यांमुळे महिलांचा अवमान झाल्याचा तसेच संवेदनशील सामाजिक विषयांबाबत अयोग्य भाष्य करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय वैद्यकीय शिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या मृतदेहासंदर्भातील एका वक्तव्यावरूनही वाद निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र सायबर सेलने या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील विविध कलमे तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात प्रणित मोरे, हिमांशु जांगडा आणि डॉ. सेजल पवार यांच्यासह संबंधित प्रक्रियेत सहभागी असलेल्या अन्य व्यक्तींचाही समावेश करण्यात आला आहे. चौकशीसाठी संबंधितांना समन्स बजावण्यात आले असून त्यांचे जबाब नोंदवल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणावर समाजातील विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटल्या असून संबंधित काही व्यक्तींनी सार्वजनिक स्पष्टीकरण किंवा माफीही मागितली आहे. सायबर सेलने तपास सुरू असल्याचे सांगत दोषी आढळणाऱ्यांविरोधात कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे नमूद केले आहे. तसेच सर्व डिजिटल कंटेंट निर्माते, इन्फ्लुएन्सर्स आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांनी ऑनलाइन मजकूर तयार व प्रसारित करताना कायद्याचे पालन करून जबाबदारीने वागावे, तसेच कथित आक्षेपार्ह किंवा अश्लील मजकूर पुढे शेअर अथवा फॉरवर्ड करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

