पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील ढोल-ताशा पथकांनी नदीपात्र, महापालिकेच्या मोकळ्या जागा तसेच शाळांच्या मैदानांवर सरावाला सुरुवात केली आहे. मात्र, निवासी भागांजवळ होणाऱ्या या सरावामुळे नागरिकांना होणारा त्रास आणि काही ठिकाणी महापालिकेची परवानगी न घेता सुरू असलेल्या सरावाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने आता ढोल-ताशा पथकांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे शहरातील गणेशोत्सवाला मोठी परंपरा असून, गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत ढोल-ताशांसह लेझीम, टिपरी, झांजा, शंखनाद अशा विविध पारंपरिक पथकांचे सादरीकरण केले जाते. या पथकांकडून उत्सवाच्या काही आठवडे आधीपासूनच शहरातील विविध भागांत सराव सुरू केला जातो. प्रामुख्याने नदीपात्रातील जागा, महापालिकेच्या मालकीची मोकळी मैदाने आणि शाळांची मैदाने यांचा सरावासाठी वापर केला जातो. काही ठिकाणी रस्त्यांच्या कडेलाही पथकांकडून सराव करण्यात येतो. निवासी भागांच्या जवळ ढोल-ताशांचा मोठ्या आवाजात सराव झाल्यास स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे ढोल-ताशा पथकांनी सराव करताना कोणती काळजी घ्यावी, कोणत्या विभागाची परवानगी घ्यावी, सरावाची वेळ कोणती असावी आणि किती कालावधीसाठी सराव करता येईल, याबाबत नियम निश्चित करण्याचे काम महापालिका प्रशासनाने सुरू केले आहे. यासाठी महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन, शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या उपायुक्तांकडून आवश्यक अहवाल मागविण्यात आला आहे. या अहवालाच्या आधारे महापालिका प्रशासनाकडून नियमावली तयार करण्यात येणार असून, ती लागू झाल्यानंतर ढोल-ताशा पथकांना त्यानुसारच सराव करावा लागणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शहरातील काही ढोल-ताशा पथकांनी नदीपात्रात सराव सुरू केला होता. या सरावासाठी महापालिकेच्या कोणत्याही विभागाची परवानगी घेण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आठवड्यात पुणे शहरासह धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरणांमधून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली होती. डेक्कन जिमखाना आणि पेठ परिसरांना जोडणारा बाबा भिडे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. नदीकाठच्या रस्त्यावरही पाणी आल्याने काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात आली. अशा परिस्थितीत याच परिसरात काही ढोल-ताशा पथकांकडून सराव सुरू असल्याची माहिती समोर आली होती. महापालिकेच्या मालकीच्या जागांवर परवानगी न घेता सराव सुरू केल्याने महापालिकेचे संभाव्य उत्पन्नही बुडत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. काही पथकांना राजकीय पक्षांचा पाठिंबा असल्याने ते कोणतीही परवानगी न घेता सराव करत असल्याचे प्रकारही प्रशासनाच्या लक्षात आले आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रस्तावित नियमावली महत्त्वाची ठरणार आहे. कोणत्या पथकांना कोणत्या ठिकाणी सराव करता येईल, त्यासाठी कोणती परवानगी आवश्यक असेल आणि सरावासाठी कोणत्या वेळेची मर्यादा असेल, याबाबत स्पष्ट नियम निश्चित करण्यात येणार आहेत. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले की, ढोल-ताशा सराव पथकांबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे. या प्रस्तावात विविध बाबींचा समावेश करण्यात येणार असून, आयुक्तांची मान्यता मिळाल्यानंतर नियमावलीची अंमलबजावणी सुरू केली जाईल. सध्या महापालिकेने कोणत्याही ढोल-ताशा पथकाला सरावासाठी अधिकृत परवानगी दिलेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

