नवी मुंबई : ‘नशा मुक्त नवी मुंबई ‘ या अभियाना अंतर्गत पोलिसांनी कारवाई करून, जप्त केलेले २६ कोटी ८४ लाख रुपयांचे अमली पदार्थ, नवी मुंबई पोलिसांनी तळोजा एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट येथे नष्ट केले आहेत. यावेळी आमदार मंदा म्हात्रे, सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, गुन्हे शाखेचे उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक आयुक्त अशोक राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय निगडे, यांसह मुंबई वेस्ट मॅनेजमेंटचे अधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबई शहरातील युवा पिढी नशेच्या आहारी जाऊन त्यांचे आयुष्य उध्वस्त होऊ नये, यासाठी नवी मुंबई पोलिसांनी नशा मुक्त नवी मुंबई ही मोहीम उभारली. या मोहिमेच्या जनजागृतीसाठी मोठमोठे दिग्गज व सुप्रसिद्ध अभिनेत्यांना बोलवण्यात आले. याच जनजागृती सोबत नवी मुंबई पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कारवाईचा धडाका सुरू केला. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी अमली पदार्थ विरोधी कारवाईच्या सक्त सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत कमी किमती पासून ते लाखो करोड रुपयांचे अंमली पदार्थ हस्तगत केले होते. या कारवाईत अनेक आरोपींना अटक करून त्यांना गजाआड केले. यामध्ये परदेशी आरोपींचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. नवी मुंबई परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या १०३ आफ्रिकन नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. तर त्यातील ९६ जणांना देशातून हद्दपार करण्यात आले आहे. उर्वरित आरोपींवर न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलंय.

