पुणे : पुणे-बंगलोर महामार्गावरील हॉटेल रिपल्स येथे खुलेआम हुक्का पार्लर तसेच दारुची विक्री केली जात असल्याचे आढळून आले. खंडणी विरोधी पथकाने दोघांवर कारवाई करुन ४१ हजारांचा माल जप्त केला आहे. निलेश उद्धव कांबळे (वय ३४, रा. पाण्याच्या टाकीजवळ,वडगाव ), प्रमोद शांताराम खुटवड (वय २९, रा. हटवे, खु़ हतवे बु़) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याबाबत पोलीस हवालदार सुरेंद्र दिलीप जगदाळे यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आंबेगाव पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी बेकायदेशीर अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक गौरव देव, सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका गोरे यांना बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, रिपल्स हॉटेल येथे बेकायदेशीर रित्या हुक्का तसेच दारु विक्री केली जात आहे, असे कळविले. त्या माहितीनुसार पोलीस पथक तातडीने हॉटेल रिपल्स येथे गेले. हॉटेलमध्ये काही ग्राहक हुक्का ओढत होते. त्यांच्या टेबलवरच बियरच्या बाटल्या ठेवल्या होत्या. तेथील १७ हुक्का पॉट, हुक्का फ्लेवरचे डबे, बियरच्या बाटल्या असा ४१ हजार १०२ रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका गोरे अधिक तपास करीत आहेत.