पुणे : लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी केब्रिज येथे भाषण देताना भारत हे राष्ट्र नाही तर एक युनियन स्टेट आहे असे सांगितले. पण भारताच्या संविधानाच्या सरनाम्यातच राष्ट्र असा स्पष्ट उल्लेख आहे. राहुल गांधींना संविधान शिकविले पाहिजे, असे मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. पूर्व पुण्यातील मंगळवार पेठेत ६ नोव्हेंबर रोजी प्रबोधन मंच, श्री सिद्धेश्वर मंदिर ट्रस्ट, सजग रहो अभियान द्वारे आयोजित ‘संविधान आणि राजकीय हिंदुत्व’ या मतदार जागृती कार्यक्रमात ते बोलत होते.
धर्माधिकारी म्हणाले, ‘शेख हसिना यांना बांग्लादेशातुन पळुन यावे लागले आहे. हा भारतासाठी एक धडा आहे. पाकिस्तान व बांग्लादेश दोन्ही देशाची राज्यघटना इस्लामिक आहे. तेथील अनेक कायदे मानवता विरोधी आहेत. फाळणीच्या वेळी पाकिस्तानात १० टक्के हिंदू होते.आता तिथे हिंदू जवळपास संपले आहे. फाळणीच्या वेळी बांग्लादेशात ३० टक्के हिंदू होते. आज ८ टक्के राहिले आहेत. भारतात मात्र फाळणीवेळी मुस्लिम ९ टक्के होते ते आता १४ टक्क्यापर्यंत पोहोचले आहे. काही राजकीय पक्ष मुस्लिमांना राखीव जागा मिळाल्या पाहिजेत अशी मागणी करत आहेत. हे संविधान विरोधी आहे. त्यामुळे हिंदूंनी गाफील राहू नये. मुस्लिमांनी मुस्लिम म्हणून एकगठ्ठा मतदान केले तर संवैधानिक अधिकार आणि हिंदुनी हिंदु म्हणुन मतदान केले तर त्याला बहुसंख्याकवाद म्हणायचे हा ढोंगीपणा आहे.’
‘ समान नागरी कायदा तातडीने लागू करण्याची गरज आहे. समान नागरी कायदा डॉ. बाबासाहेबा आंबेडकरांना हवा होता. घटना तयार करताना डॉ.आंबेडकरांचे जिथे जिथे ऐकले तिथे तिथे भारताला फायदा झाला आहे. कलम ३७० ला डॉ. आंबेडकरांचा तीव्र विरोध होता. कलम ३७० रद्द करणारे सरकार खरे संविधानवादी आहे. देशात १९७५ साली आणीबाणी लागु केली तेव्हा संविधान धोक्यात आले होते,’ असे धर्माधिकारी म्हणाले.