मुंबई : राज्यात गुटखा, सुगंधित तंबाखू आणि निकोटीनयुक्त पानमसाला यांसारख्या आरोग्यास घातक पदार्थांच्या छुप्या विक्रीविरुद्ध आतापर्यंतची सर्वात मोठी आणि कडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या बेकायदेशीर व्यापारात सामील असलेल्या टोळ्यांविरुद्ध थेट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात अशा पदार्थांच्या उत्पादन आणि विक्रीवर आधीपासून बंदी असली तरी काही भागांमध्ये संघटित टोळ्यांमार्फत छुप्या पद्धतीने हा व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता केवळ किरकोळ विक्रेत्यांवर नाही, तर या संपूर्ण रॅकेटमागील मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
एफडीएच्या तपासात हा काळाबाजार मोठ्या आणि संघटित पुरवठा साखळीद्वारे चालत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये बनावट कागदपत्रे, बेनामी आर्थिक व्यवहार आणि इतर राज्यांमधून छुप्या गोदामांपर्यंत माल पोहोचवण्याचे प्रकार समाविष्ट आहेत. त्यामुळे आता उत्पादक, मुख्य वितरक, वाहतूकदार आणि गोदाम मालक यांच्यावरही थेट कारवाई करून त्यांना न्यायालयीन प्रक्रियेत आणले जाणार आहे. ज्या गुन्ह्यांमध्ये तीन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा होऊ शकते आणि ज्यामध्ये मागील दहा वर्षांत अनेक आरोपपत्रे दाखल झाली आहेत, अशा प्रकरणांमध्ये मकोका लागू करण्याची शक्यता तपासली जाणार आहे. या मोहिमेसाठी एफडीए आणि पोलीस यंत्रणा संयुक्त छापे टाकणार असून प्रत्येक जिल्ह्यात मकोका लागू करण्यायोग्य गुन्ह्यांची स्वतंत्र नोंद ठेवली जाणार आहे. राज्य स्तरावर या कारवाईवर थेट देखरेख ठेवली जाईल. मकोका लागू झाल्यानंतर आरोपींना सहज जामीन मिळणार नाही आणि न्यायालयात कठोर पुरावे सादर करून जामीन नाकारण्यासाठी प्रयत्न केले जातील. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, कायदेशीर व्यवसाय करणाऱ्या कोणत्याही व्यापाऱ्याला त्रास दिला जाणार नाही, मात्र आरोग्याशी खेळ करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनीही अशा अवैध साठवणूक किंवा विक्रीबाबत माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

