ठाणे : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) स्थानक परिसरात सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधा विकास कामांमुळे रेल्वे प्रशासनाने ४८ तासांचा सलग मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. एलटीटी स्थानकाजवळ शंटिंग नेकचे बांधकाम, सिक साइडिंगमध्ये आवश्यक बदल, देखभाल साइडिंग यार्डचे उन्नतीकरण तसेच पिट लाईन्सच्या विस्ताराची महत्त्वाची कामे सुरू आहेत. ही सर्व कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी १४ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून १६ जून रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत सलग ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या ब्लॉकचा परिणाम विशेषतः लांब पल्ल्याच्या काही गाड्यांच्या वाहतुकीवर होणार असून, प्रवाशांच्या प्रवासात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. रेल्वेच्या मते, भविष्यातील सुविधा आणि रेल्वे संचालन अधिक सक्षम करण्यासाठी ही कामे आवश्यक आहेत.
या मेगा ब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गावरील दोन महत्त्वाच्या गाड्यांच्या सेवांमध्ये बदल करण्यात आला आहे. १३ आणि १४ जून रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्रमांक १६३४६ तिरुवनंतपुरम–एलटीटी नेत्रावती एक्स्प्रेस नियोजित लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत न जाता ठाणे स्थानकापर्यंतच धावणार आहे. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक १२६२० मंगळुरू सेंट्रल–एलटीटी मत्स्यगंधा एक्स्प्रेसही एलटीटीऐवजी ठाणे स्थानकावरच आपला प्रवास समाप्त करेल. त्यामुळे एलटीटीपर्यंत जाणाऱ्या प्रवाशांना ठाणे स्थानकावर उतरून पुढील प्रवासासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था करावी लागणार आहे. या बदलांमुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आगाऊ नियोजन करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच प्रवासापूर्वी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत माहिती केंद्रांमार्फत गाड्यांच्या वेळापत्रकाची आणि बदलांची माहिती तपासून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आगामी काही दिवसांत या कामांमुळे रेल्वे सेवांमध्ये होणाऱ्या बदलांकडे प्रवाशांनी विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे रेल्वे प्रशासनाने नमूद केले आहे.
