ठाणे : गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वे स्थानकांवर तसेच प्रवासा दरम्यान प्रवाशांची तिकीट तपासणी मोहीम राबविली जात आहे. विना तिकीट प्रवाशांना आळा घालण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत ठाणे स्थानकात सोमवार, ९ ऑक्टोबर या एकाच दिवशी तब्बल ३ हजार ९२ प्रवासी विना तिकीट आढळले असून त्यांच्याकडून ८ लाख ६६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सकाळी ७ वाजल्यापासून सुरू झालेल्या या मोहिमेत तब्बल १२० तिकीट तपासणीस, रेल्वे सुरक्षा दलाचे ३० जवान असा मोठा फौजफाटा यासाठी ठाणे स्थानकात तैनात करण्यात आला होता. मध्य रेल्वे वरील ठाणे रेल्वे स्थानक हे अत्यंत गर्दीचे आणि वर्दळीचे स्थानक म्हणून ओळखले जाते. या स्थानकातून उपनगरीय गाड्यांसह लांब पल्यांच्या गाड्यांची दिवसभर वाहतूक सुरू असते. यामुळे ठाणे स्थानकात दिवसभरात सुमारे ५ ते ७ लाख प्रवाशांची ये-जा असते. ठाणे स्थानकातून कर्जत, कसारा, मुंबई, नवी मुंबई, पनवेल या ठिकाणी जाणाऱ्या उपनगरीय रेल्वे गाड्यांची संख्या देखील मोठी आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रवासी संख्येमुळे या सर्व गाड्या कायम गर्दीने ओसंडून वाहत असतात. यात विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही मोठी असते. यामुळे नियमित स्वरूपात पैसे खर्च करत तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
प्रथम श्रेणीच्या डब्ब्यासह, एसी लोकल गाड्यांमध्ये काही प्रवासी निर्धास्तपणे विना तिकीट प्रवास करत असतात किंवा त्या श्रेणीचे तिकीट नसताना प्रवास करत असतात. यामुळे अनेकदा प्रवाशांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत असतात. याबाबत अनेक प्रवाशांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे लिखित स्वरूपात तसेच समाज माध्यमांद्वारे आपल्या तक्रारी नोंदविल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मध्ये रेल्वे प्रशासनाकडून गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वेवरील डोंबिवली, कल्याण, ठाणे, दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकांमध्ये मोठ्या प्रमाणात तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या बरोबरच प्रवासा दरम्यान ही प्रवाशांची तिकीट तपासणी केली जात आहे. या मोहिमेदरम्यान प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे. फलाटां बरोबरच, पादचारी पूल, रेल्वे स्थानकातून बाहेर पडायचे मार्ग या ठिकाणी रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांसह तिकीट तपासणीस प्रवाशांची तपासणी करत असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या मोहीमे दरम्यान ठाणे स्थानकात सोमवार, ९ ऑक्टोबर रोजी तब्बल ३ हजार ९२ प्रवासी विना तिकीट आढळले. त्यांच्याकडून ८ लाख ६६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सकाळी ७ ते रात्री ११ वाजे पर्यंत ही मोहीम राबवण्यात आली होती. यासाठी १२० तिकीट तपासणीस तैनात करण्यात आले होते.