सातारा : दिवाळीतील सलग सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पर्यटकांनी बहरले आहे. वेण्णालेक नौकाविहारसह प्रेक्षणीय स्थळावर हिरवागार निसर्ग, सूर्यास्त व सूर्योदयाचे विहंगम दृश्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची चांगलीच गर्दी होताना दिसत आहे. महाबळेश्वरची गुलाबी थंडी, मनमोहित करणारे निसर्गसौंदर्य अन् स्ट्रॉबेरीची चव चाखताना पर्यटक पाहावयास मिळत आहेत.
महाबळेश्वरमध्ये दिवाळी हंगाम सुरू असल्याने पर्यटकांच्या स्वागतासाठी हॉटेलसह दुकानदार सज्ज झाले आहेत. देश-विदेशातील पर्यटकांची रेलचेल या निसर्गरम्य पर्यटनस्थळी वाढली आहे. दिवाळी व उन्हाळी हंगामात पर्यटकांची संख्या लक्षणीय असते. दिवाळीची सुटी सुरू झाल्याने या थंड हवेच्या पर्यटनस्थळी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. पर्यटक हिरवाईने नटलेला निसर्ग अनुभवत असतानाच पर्यटक गुलाबी थंडीची मजा लुटत आहेत.
केट्स पॉइंट, ऑर्थरसीट पॉइंट, श्रीक्षेत्र महाबळेश्वर मंदिर, ऐतिहासिक किल्ले प्रतापगड, लॉडवीक पॉइंट सूर्योदयासाठीचा प्रसिद्ध विल्सन पॉइंट, सूर्यास्तासाठीचा प्रसिद्ध मुंबई पॉइंटसह पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण लिंगमळा धबधबा ही पर्यटकांच्या पसंतीची ठिकाणे असलेली ही पर्यटनस्थळे गर्दीने गजबजून गेली आहेत.
महाबळेश्वरचे मुख्य आकर्षणाचे ठिकाण, नौकाविहारासाठी प्रसिद्ध वेण्णालेक येथे नौकाविहारासाठी पर्यटकांच्या रांगा लागल्या आहेत. पर्यटक नौकाविहार करताना पाहावयास मिळत आहेत, तर हौशी पर्यटक वेण्णालेकवर घोडेसवारीचा आनंद लुटताना दिसत आहेत. वेण्णालेकवर बच्चे कंपनीसाठी गेम्सची धूम वेण्णालेकवर सुरू आहे. जणू ‘जत्रे’चाच माहोल आहे. खवय्यांसाठी स्ट्रॉबेरीपासून बनविलेले विविध खाद्यपदार्थ, गरमागरम मका कणीस, फ्रँकी, पॅटिस, पाणीपुरी, भेळ, पावभाजी अशा पदार्थांवर ताव मारताना पर्यटक पाहावयास मिळत आहेत.