मुंबई : भारतामध्ये बेकायदा वास्तव्यास असल्याप्रकरणी पकडण्यात आलेल्या बांगलादेशी महिलेने सहार पोलीस ठाण्यातून पलायन केल्याचा गंभीर प्रकार घडला. महिला शौचालयात गेली होती, तेथून तिने पलायन केल्याचे उघड झाले. याप्रकरणी सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिलेचा शोध सुरू आहे. महिला पोलीस शिपाई ललीता कोते (३५) यांच्या तक्रारीवरून सहार पोलीस ठाण्यात याप्रकरणी भादंवि कलम २२४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बांगलादेशी नागरिक कविता बेगम मोहम्मद शाह आलम मिया (३०) हिला बनावट कायदपत्रे तयार करून बेकायदेशिररित्या भारतात राहिल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. याप्रकरणी सहार पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४६५, ४६८, ४७१, ४२० व पारपत्र कायदा कलम १२ व परदेशी नागरिक कायदा कलम १४ (अ) (ब) अंतर्गत अटक करण्यात आली होती. तिला सोमवारी तिसऱ्या मजल्यावरील महिला अंमलदार कक्षामध्ये ठेवण्यात आले होते.
ती सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास शौचालयात गेली. तेथून नजर चुकवून तिने पलायन केले. कोते व तेथील महिला पोलीस शिपाई हिरेमठ यांनी तपासणी केली असता ती कोठेच सापडली नाही. त्यामुळे आरोपी महिला पळून गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यांनीही सर्वत्र तपासणी केली असता ती महिला सापडली नाही. अखेर यासंदर्भात सहार पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पलायन केल्याप्रकरणी बांगलादेशी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिचा शोध सुरू आहे.