पिंपरी : मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याबाबत महापालिकेशी संबंधित अभिलेखांमधील कुणबी जातीच्या नोंदी शोधल्या जाणार आहेत. या नोंदीची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. राज्य शासनाच्या निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने १९४८ ते १९६७ या कालावधीतील जन्म-मृत्यू नोंदी, शैक्षणिक अभिलेख, भूमी अभिलेख, सेवानोंद पुस्तके, तसेच महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या करआकारणी नोंदवहीमध्ये कुणबी जातीच्या पुराव्यांची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी केली जाणार आहे. त्याबाबतचा अहवाल शासनाच्या मार्गदर्शक निर्देशांनुसार सादर केला जाणार आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभाग, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, भूमि व जिंदगी, लेखा विभाग तसेच करआकारणी व करसंकलन विभागाच्या प्रमुखांनी सन १९४८ ते १९६७ या कालावधीमध्ये महापालिकेच्या उपलब्ध अभिलेखांची छाननी करावी.
अभिलेखांमध्ये कुणबी जातीच्या नोंदी असल्याचे आढळून आल्यास अशा पुराव्यांची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी केली जाणार आहे. या कामकाजासाठी संबंधित विभागाचे प्रमुख जबाबदार असणार आहेत. या विभागप्रमुखांनी नोडल अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कामकाज पूर्ण करावे. या कामकाजासाठी संबंधित विभागाच्या कर्मचारी वर्गाची नियुक्ती करावी, पुराव्याच्या तपासणीअंती विभागस्तरावर स्वतंत्र नोंदवही तयार करण्यात यावी. विवरण पत्रामध्ये माहितीच्या नोंदी आणि संकलन करून ते नोडल अधिकाऱ्यांकडे सादर करावे. हे काम कालमर्यादित असून, वेळेत कामकाज पूर्ण करावे, असे निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.