पुणे : शहरातील बेकायदा जाहिरातफलकांवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेत सर्व अधिकृत फलकांवर ‘क्यूआर कोड’ लावणे अनिवार्य केले आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना संबंधित फलकाची परवानगी, मालकी हक्क आणि वैधतेची माहिती थेट मोबाइलवर स्कॅन करून पाहता येणार आहे. आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला असून, महाराष्ट्र शासनाच्या ९ मे २०२२ च्या जाहिरात नियंत्रण नियमावलीनुसार त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. यामुळे शहरातील अधिकृत आणि बेकायदा फलक ओळखणे सोपे होणार असून, पारदर्शकता वाढण्यास मदत होईल.
महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाकडून हे ‘क्यूआर कोड’ उपलब्ध करून दिले जाणार असून, प्रत्येक फलकाच्या खालच्या उजव्या कोपऱ्यात तो स्पष्टपणे लावणे बंधनकारक आहे. ज्या फलकांवर कोड नसेल किंवा स्कॅन केल्यानंतर माहिती उपलब्ध होणार नाही, ते फलक बेकायदा समजून २७ मेपासून कारवाई केली जाणार आहे. तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या फलकांवर कारवाई करण्याचे अधिकार क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. बेकायदा फलकांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शहरातील वाढत्या अनधिकृत जाहिरातफलकांना आळा बसेल आणि नागरिक व वाहनचालकांना होणारा त्रास कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

