ठाणे : नाशिक येथील तपोवनातील वृक्षांचा मुद्दा गाजत असताना ठाण्यातील प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या कामासाठी ७०० हून अधिक वृक्षांवर कुऱ्हाड चालविली जाणार आहे. यातील काही वृक्षांचे पुर्नरोपण करण्यात येणार असल्याचा दावा करण्यात येत असला तरी या वृक्षांचे पुर्नरोपण होईल का हा देखील प्रश्न आहे.
ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाची इमारत जुनी झाली आहे. त्यामुळे रुग्णालयाचे बांधकाम केले जाणार असून जुनी इमारत पाडली जाणार आहे. मनोरुग्णालयाच्या आवारात मोठ्याप्रमाणात विविध प्रजातींचे वृक्ष आहेत. परंतु आता रुग्णालयाच्या इमारतीच्या निर्माणासाठी येथील वृक्षांचा अडथळा येत आहे. येथील १ हजार ६१४ विविध देशी प्रजातीचे वृक्ष असून ७२४ वृक्ष तोडण्याची परवानगी सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडे मागितली आहे. यात ३०३ वृक्ष तोडले जाणार असून ४२१ वृक्षांचे पुनर्रोपण करण्याचा दावा करण्यात आला आहे. या वृक्षांमध्ये फणस, कैलासपती, अशोक, आंबा, बदाम, शेवगे, नारळ, ताड, साग, भोकर, कांचन, अनंता, बेहरी माड, कडुलिंब, चाफा, उंबर यासांरख्या विविध वृक्षांचा सामावेश आहे.

