मुंबई : दादर पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या टिळक उड्डाणपुलालगत केबल पुलाचे काम सुरू असून भविष्यात हा मुंबईतील पहिला जुळा (ट्विन) केबल पूल ठरणार आहे. दादरमधील टिळक पुलावर वाहतूक कोंडीची मोठी समस्या असून या पुलाचे अत्याधुनिक पद्धतीने बांधकाम करून विस्तार करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात दादरमधील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या मुंबईत अतिधोकादायक पुलांच्या दुरुस्तीची आणि पुर्बांधणीची कामे हाती घेण्यात आली आहेत. रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या उड्डाणपुलाची कामे वेगाने सुरू आहेत. शीव, प्रभादेवीप्रमाणे अनेक उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून वाहतूक पर्यायी उड्डाणपुलावरून वळण्यात आली आहे. त्यामुळे इतर पुलावर वाहतूक कोंडी होत आहे. यापैकीच एक टिळक पूल आहे. टिळक पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असून आता प्रभादेवी उड्डाणपुलावरील वाहतूक या पुलावर वळवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. दरम्यान, टिळक पुलालगतच्या केबल पुलाचे काम वेगाने सुरू असून पुढील वर्षी हा नवा उड्डाणपूल वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

