अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील लहान गावे तसेच पाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाईची समस्या उद्भवल्याचे चित्र पहायला मिळत आहे. राज्य शासनाकडून जल जीवन मिशन पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू असली तरी ही कामे पूर्ण होण्यास अद्याप अवधी आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक गाव, पाड्यांत पाच दिवसांतून एकदा पिण्याचे पाणी मिळत असल्याने पाण्यासाठी महिला, लहान मुलींची पाण्याच्या टाक्यांजवळ झुंबड उडत आहे. नैसर्गिक जलस्रोत आणि मुबलक पाण्याचा साठा असलेल्या धरणांचा वेढा असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या पाणीटंचाईची स्थिती आहे. अंबरनाथ तालुक्यात २८ ग्रामपंचायती आहेत. यातील अनेक गावे धरण क्षेत्रापासून हाकेच्या अंतरावर आहेत.
बदलापूरपासून जवळच असलेल्या चरगाव या ग्रुप ग्रामपंचायतीत आठ पाडे आहेत. प्रत्येक गावात आठशे ते हजार लोकवस्ती आहे. येथील नागरिकांना पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध नसल्याने मोठे हाल होत आहेत. गावात असलेल्या बोअरवेलमधील पाणी एका टाकीत साचवून ठेवले जाते. हे पाणी नागरिकांना पाच दिवसांतून एकदाच उपलब्ध होत असल्याने पाणी भरण्यासाठी टाकीजवळ गावातील महिला आणि लहान मुलींची एकच झुंबड उडते. सध्या या गावामध्ये जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनंतर्गत विहीर, पाण्याच्या टाक्या बांधण्याचे काम सुरू असून अनेक नवीन बोअरवेलची कामे सुरू असल्याचे पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात येत आहे. योजनांतर्गत ५० टक्के कामे पूर्ण झाली असून फेब्रुवारीपर्यंत ही कामे पूर्ण होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांनी दिली. शासकीय योजनांचा संथ कारभार पाहता नागरिकांना जानेवारी महिन्यातच पाच दिवसांतून एकदा पाणी मिळत असेल तर, येत्या उन्हाळ्यात येथील नागरिकांना पाण्यासाठी काही किलोमीटर वणवण करावी लागण्याच्या भीतीने ग्रामस्थ चिंतेत आहेत.