मुंबई : कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात. कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी विभागाने जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे काम करावे असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री प्रभात लोढा यांनी केले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आयुक्तालय येथे कौशल्य विकास विभागामार्फत सर्व उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त व जिल्हा कौशल्य विकास समन्वयक अशा सर्व अधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास, रोजगार आयुक्त तथा कौशल्य विकास सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी, कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू अपूर्वा पालकर उपस्थित होते.
मंत्री श्री.लोढा म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांच्या माध्यमातून गावागावात रोजगार निर्मिती करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत. विभागीय व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसमवेतच ट्रेनिंग पार्टनर व ट्रेनिंग सेंटरचे प्रमुख देखील यांनी या कामासाठी सहकार्य करावे. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, महाराष्ट्र इंटरनॅशनल, नाविन्यता, सारथी या योजना प्रभावीपणे राबवाव्या. १९ जानेवारी २०२४ रोजी जागतिक जागतिक कौशल्य स्पर्धेसह आयुक्तालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या इतर योजनेबाबत काही शंका असल्यास दोन दिवस होणाऱ्या कार्यशाळेत निश्चित सर्वांना शंका समाधान होईल. याबाबतीत काही सूचना किंवा अडचणी असतील तर जरूर सांगाव्यात. त्यावर मार्ग काढण्यात येईल, असेही मंत्री श्री.लोढा म्हणाले.