कल्याण : अयोध्येत २२ जानेवारीला श्रीराम मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा होणार असल्याने देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. राम भक्त रामनामात दंग झालेत. राम भक्तांना श्रीरामाच्या भेटीची आतुरता लागली आहे .याच भक्तीचा फायदा कल्याणमध्ये तिघांनी घेतल्याचं उघड झालं आहे .आम्ही तुम्हाला श्रीरामाचं दर्शन घडवून आणतो, असं आमिष दाखवून एका ५८ वर्षीय महिलेचे सुमारे अडीच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले आहेत. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच महिलेने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे . पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. तक्रारदार महिला खडकपाडा भागातून पायी चालली होती. यावेळी त्यांना तीन भामट्यांनी अडवले. आम्ही रामभक्त आहोत, आम्ही तुम्हाला प्रभू रामचंद्रांचे दर्शन घडवून आणतो. यासाठी तुम्ही तुमच्या हातातील सोन्याच्या बांगड्या, इतर सोन्याचा ऐवज पिशवीत गुंडाळून ठेवा, असे भामट्यांनी महिलेला सांगितलं. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदार महिलेने आपल्या जवळील २ लाख ६६ हजाराचा सोन्याचा ऐवज पिशवीत गुंडाळला.
पिशवीत गुंडाळलेला ऐवज कुणी चोरू नये असे सांगून स्वतःकडे घेतला. आपणास रामाचे दर्शन होत आहे या आनंदात महिला होती. या संधीचा फायदा घेत त्या तिघांनी दागिने घेऊन तेथून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने महात्मा फुले पोलीस स्थानकात धाव घेऊन तक्रार दाखल केली असून खडकपाडा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.