मुंबई : वाढत्या उष्णतेमुळे मुंबईवर पाणी संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये फक्त साडे १० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातच गेल्या आठवड्यापासून वाढत्या तापमानामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने पाणी साठा कमी होत आहे. त्यामुळे मुंबईकरांवर लवकरच पाणी कपातीचे संकट ओढावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई शहरासह महानगराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून यापूर्वीच भातसा आणि अप्पर वैतरणा जलाशयातून अतिरिक्त पाणीसाठा देण्यास मंजुरी दिली होती. दरवर्षीप्रमाणे ३१ जुलैपर्यंत मुंबईला पाणीसाठा पुरेल, अशा रीतीने उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन पालिकेनं केलं आहे. पण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये फक्त साडे १० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच १२० किलोमीटर अंतरावरुन पाण्याच्या पाईपलाईनमधून पाणी गळतीही होत आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार आणि तुळशी या धरणातून मुंबईला पाणीपुरवठा होतो. त्यामुळे मुंबईकरांची वर्षभराची तहान या सातही धरणातील पाणीपुरवठ्यातून होते. त्यामुळे यंदा जूनमध्ये जर मान्सूनचे आगमन झाले नाही, तर मुंबईवर पाणी कपातीचे संकट येऊ शकते.
22 मे पर्यंत उपलब्ध पाणीसाठा
अप्पर वैतरणा ३९३० दशलक्ष लिटर एकूण १.७३ टक्के
मोडक सागर २३९५३ दशलक्ष लिटर एकूण टक्के १८.५८
तानसा ४१७५८ दशलक्ष लिटर एकूण टक्के २९.४७
मध्य वैतरणा २१४८७ दशलक्ष लिटर एकूण टक्के ११.१०
भातसा ५३१०६ दशलक्ष लिटर एकूण टक्के ७.४१
विहार ६७३२ दशलक्ष लिटर एकूण टक्के २४.३०
तुळशी २५०५ दशलक्ष लिटर एकूण टक्के ३१.१३