पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिक एकादशीनिमित्त शासकीय महापूजा पार पडली. पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व सायली पुलकुंडवर यांच्यासोबत मानाचे वारकरी यांनी विठ्ठल-रुक्मिणीची पूजा केली.
वारकरी भाविकांना तसेच राज्यातील सर्व जनतेला पांडुरंगाच्या कृपेने सुख, समृद्धी, लाभो त्यांच्या जीवनात ऐश्वर्य व भरभराट येवो असे साकडे विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत फुलकुंडवार यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापुजेच्याप्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व सायली पुलकुंडवर यांच्यासोबत यंदाच्या वर्षी बाबुराव बागसरी सगर व सागरबाई बाबुराव सगर या दाम्पत्याला पूजेचा मान मिळाला.
शासकीय महापूजेच्या वेळी उपस्थित राहणाऱ्या मानाच्या वारकरी निवडीसाठी दर्शन रांगेतून माळकरी भाविकांची निवड करण्यात आली. बाबुराव बागसरी सगर व सागरबाई बाबुराव सगर हे दाम्पत्य लातूर जिल्ह्याच्या उदगीर तालुक्यातील असून गेल्या १४ वर्षांपासून नियमितपणे वारी करीत आहे. गवंडी काम करून आपला उदरनिर्वाह करणारे सगर दाम्पत्य यांचा आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या हस्ते राज्य परिवहन महामंडळाचा वर्षभर मोफत एसटी पास देण्यात आला. प्रारंभी मंदिर समितीच्या वतीने डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार व त्यांच्या पत्नी सायली पुलकुंडवर व मानाचे वारकरी यांचा सत्कार करण्यात आला. विठ्ठलाची पूजा करण्याचा मान मिळाल्यामुळे मानाचे वारकरी सगर दाम्पत्याला अश्रू अनावर झाले.
आज कार्तिक एकादशीनिमित्ताने विठ्ठल – रुक्मिणीच्या गर्भगृहात झेंडू , शेवंती, कार्नेशियन, गुलाब अशा विविध पंधरा प्रकारच्या पाना फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. या सजावटीसाठी वेगवेगळ्या पाच टन फुलांचा वापर करण्यात आला आहे. पुण्यातील विठ्ठल भक्त राम जांभूळकर यांनी ही सटावट केली आहे. श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा गाभारा झेंडूच्या फुलांसह विविध आकर्षक पाना फुलांनी सजवण्यात आला आहे. तसंच सोळखांबी, सभामंडप अशा मंदिराच्या विविध भागांना देखील देशी विदेशी फुलांची सजावट करण्यात आली. आज कार्तिक शुद्ध एकादशी असल्याने चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी भक्तांनी गर्दी केली आहे.