1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेले माजी क्रिकेटपटू मदनलाल यांनी निवड समितीवर प्रश्न उपस्थित केले आहे. जखमी क्रिकेटपटूंना संघात स्थान दिले जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जायबंदी खेळाडूंना संघात स्थान दिले जात मात्र युझवेंद्र चहलला संघातून वगळले जाते याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. बीसीसीआयने आशिया चषक स्पर्धेसाठीच्या संघाची निवड केली आहे. मात्र ही संघनिवड काही माजी क्रिकेटपटूंना रुचलेली नाही. त्यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त करत आपल्या भावना बोलून दाखवल्या आहेत.
मदनलाल यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले की, राहुल अय्यर हा तंदुरुस्त असल्याचे निवड समितीला वाटते आहे, मात्र तो खरोखर तंदुरुस्त आहे की नाही हे माहिती नाहीये. संघ निवडीत श्रेयस अय्यर यालाही स्थान देण्यात आले, तो देखील किती तंदुरुस्त आहे हे माहिती नाही असे मदनलाल यांचे म्हणणे आहे. अय्यरने प्रोफेशनल क्रिकेटही खेळले नाहीये, अय्यरची तंदुरुस्ती तपासल्यानंतरच त्याला संघात घ्यायला हवे होते असं मदनलाल यांचे म्हणणे आहे. नेटमध्ये फलंदाजी करणे आणि सामन्यात खेळणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत असे ते म्हणाले.
संघ निवडीनंतरच्या पत्रकार परिषदेत निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरला केएल राहुलच्या तंदुरुस्तीबाबत विचारले असता त्याने म्हटले की, ‘राहुल संघात यष्टिरक्षक-फलंदाज अशा दोन भूमिका पार पाडतो, अपेक्षा अशी आहे की तो पहिल्या सामन्यापासूनच तो निवडीसाठी उपलब्ध होईल. राहुल आणि अय्यर हे दोघेही बराच काळ जायबंदी होते आणि तंदुरुस्त होण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. राहुलला पुन्हा जायबंदी झाल्याने आम्हाला धक्का जरूर बसला आहे मात्र आशा आहे की तो लवकरच बरा होईल. संघासाठी तो महत्त्वाचा खेळाडू आहे.
मदनलाल यांनी हिंदुस्थानी क्रिकेट संघात युझवेंद्र चहलला स्थान न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ‘युझवेंद्र चहलला संघात न निवडल्याने मला आश्चर्य वाटल्याचं मदनलाल यांनी म्हटलंय. चहल हा बळी टीपणारा आणि संघाला जिंकून देणारा क्रिकेटपटू आहे. अक्षर पटेलने गेल्या 2-3 वर्षात चांगली कामगिरी केली आहे, मी त्याच्यावर टीका करत नाही पण त्याला ज्यासाठी संघात स्थान देण्यात आले आहे ते काम रवींद्र जडेजा आधीपासूनच करतोय.