सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातून संघर्षपूर्ण विजय मिळवून भाजपचा पहिला साताऱ्याचा खासदार अशी वेगळा विक्रमाची नोंद खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. या विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत उदयनराजे यांच्यासाठी महायुतीचे उमेदवार निवडून आणणे आणि त्यांच्यासाठी राजकीय पेरणी महत्त्वाची आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा घेणे आणि त्यांचा प्रचार करणे याकरता उदयनराजे यांनी पायाला भिंगरी लावली आहे.
उदयनराजे यांनी सातारा, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण या चार मतदारसंघांवर विशेषत्वाने लक्ष केंद्रित केले आहे. भारतीय जनता पार्टीने खासदार उदयनराजे भोसले यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश केला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात भाजपला खासदारकीच्या नात्याने जास्तीत जास्त यश मिळवण्यासाठी उदयनराजे यांची धडपड सुरू आहे. आमदार मकरंद पाटील, (वाई) डॉ. अतुल भोसले (कराड दक्षिण) मनोज घोरपडे (कराड उत्तर) आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (सातारा) यांचा उमेदवारी अर्ज भरताना खासदार उदयनराजे स्वतः जातीने उपस्थित होते.
जिल्ह्याच्या विधानसभा निवडणूक आणि त्या निमित्ताने होणाऱ्या राजकारणामध्ये उदयनराजे यांनी जाणीवपूर्वक लक्ष घालून भाजपची सातारा जिल्ह्यात सक्षम बांधणी कशी होईल, यासाठी राजकीय हालचाली सुरू ठेवल्या आहेत. यापूर्वी उदयनराजे यांचा जिल्ह्यात संपर्क नाही अशी तक्रार होती. ती दूर करण्यासाठी उदयनराजे यांचे संपर्क अभियान सुरू आहे.
सातारा जिल्ह्याची विधानसभा निवडणूक आता निर्णय टप्प्याकडे निघाली आहे. शेवटचे १३ दिवस शिल्लक असून, या पुढच्या दोन आठवड्यामध्ये दिग्गजांच्या सभा, प्रचार मेळावे कोपरासभा यांनी जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघणार आहे. सातारा जिल्ह्यात केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या दिग्गजांच्या सभा कशा होतील, यासाठी उदयनराजे यांनी जोर लावला आहे.
वातावरण निर्मिती करून अपेक्षित परिणाम साधण्यासाठी उदयनराजे यांचे मायक्रो प्लॅनिंग सुरू आहे. त्यामुळे आठ विधानसभा मतदारसंघात प्रत्येक उमेदवाराची संपर्क कार्यालय असले तरी जिल्ह्याच्या राजकीय हालचालीचे केंद्र सध्या उदयनराजे यांचे निवासस्थान जलमंदिर ठरले आहे. येथून उदयनराजे सातत्याने आपल्या महायुतीच्या उमेदवारांच्या संपर्कात आहेत. जिल्ह्याच्या अनेक उमेदवारांच्या प्रचाराचा भार त्यांनी आपल्या खांद्यावर घेतला आहे.