डोंबिवली : येथील पूर्व भागातील फडके रस्त्यावरील चिमणी गल्लीत एका नागरिकाला पूर्ववैमनस्यातून चार जणांनी अडवून त्यांना बेदम मारहाण, चाकूचा धाक दाखवून लुटले होते. या प्रकरणातील दोन जणांना कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. उर्वरित दोन जणांचा पोलीस शोध घेत आहेत.अक्षय किशोर दाते (२२), रोहित अनिल भालेराव (२३) अशी अटक आरोपींची नावे आहेत. ते स. वा. जोशी विद्यालय जवळील त्रिमूर्ती वसाहतमध्ये राहतात. यापूर्वी त्रिमूर्तीनगर झोपडपट्टी भागातून काही चोरट्यांना अटक करण्यात आली होती.
मूळचे धाराशिव जिल्ह्यातील तेलखडा गावचे रहिवासी असलेले हर्षद सरवदे हे फडके रस्त्यावरील चिमणी गल्लीत एका चहा टपरीवर चहा पित होते. तेथे आरोपी अक्षय दाते आपल्या दोन साथीदारासह आला. त्याने हर्षदला तू यापूर्वी मला काळ्या नावाने हाक का मारली. आता मी काळ्या राहिलेलो नाही. मी आता भाई झालो आहे, असे बोलून हर्षदने दोन साथीदारांच्या मदतीने मारहाण सुरू केली. हर्षदला अचानक मारहाण सुरू झाल्याने इतर नागरिकांनी मध्यस्थी करून भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. अक्षय आणि त्याचे साधीदार ऐकत नव्हते. अक्षयने जवळील चाकू हर्षदच्या गळ्याला लावला. त्यांना मारण्याची धमकी दिली. त्याच्या जवळील २७०० रूपये जबरदस्तीने काढून घेतले. तेथून ते पळून गेले.
रामनगर पोलीस ठाण्यात हर्षद सरवदे यांनी तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. या गुन्ह्याचा तपास कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार, पोलीस निरीक्षक राहुल मस्के, साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले, उपनिरीक्षक संजय माळी, हवालदार अनुप कामत, बापूराव जाधव, सचिन वानखेडे, दीपक महाजन, रवींद्र लांडगे यांनी सुरू केला होता.हर्षद यांना मारहाण करणारे आरोपी मंगळवारी संध्याकाळी दत्तनगर भागात येणार आहेत, अशी माहिती कल्याण गुन्हे शाखेचे हवालदार वानखेडे यांना मिळाली. पोलिसांनी याठिकाणी सापळा लावला. ठरल्या वेळेत आरोपी येताच पोलिसांनी अक्षय, रोहित याला अटक केली. त्याच्या अन्य एका साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.