कल्याण : कल्याण पूर्व येथील आडिवली ढोकळी भागातील रहिवासी असलेल्या दोन अल्पवयीन मुली रविवारी कल्याण शिळफाटा रस्त्यावरील टाटा नाका येथून बेपत्ता झाल्या आहेत. या दोन्ही मुलींना अज्ञातांनी फूस लावून पळवून नेली असल्याची तक्रार या मुलींच्या कुटुंबीयांनी मानपाडा पोलीस ठाण्यात केली आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी या मुलींचा शोध सुरू केला आहे. रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार शिळफाटा रस्त्यावरील टाटा नाका भागात घडला आहे. एक मुलगी १५ वर्षाची, दुसरी मुलगी १० वर्षाची आहे. या दोघी मैत्रिणी आहेत. या दोन्ही मुली हिंदी, भोजपुरी भाषा बोलतात. बेपत्ता झालेल्या एका मुलीच्या आईने मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे, आपली १५ वर्षाची मुलगी आणि तिची १० वर्षाची मैत्रिण या दोघी आडिवली ढोकळी येथील घरातून रविवारी सकाळी बाहेर पडल्या. आम्ही शिळफाटा रस्त्यावरील टाटा नाका येथे जातो असे त्यांनी घरात आईला सांगितले. सकाळी अकरा वाजता त्या टाटा नाका येथे पोहचल्या. त्यानंतर त्या घरी परतल्याच नाहीत.
त्या घरी परतल्या नाहीत म्हणुन कुटुंबीयांनी त्यांचा आडिवली ढोकळी, टाटा नाका, दावडी परिसरात शोध सुरू केला. त्या कोठेही आढळून आल्या नाहीत. या दोन्ही मुलींना अज्ञात इसमाने फूस लावून कोठेतरी पळून नेले असण्याचा संशय व्यक्त करून या मुलीच्या कुटुंबियांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून या मुलींचा शोध सुरू केला आहे. पोलीस निरीक्षक राम चोपडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक सागर चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. साहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी बडे याप्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकरणाच्या अधिक माहितीसाठी साहाय्यक पोलीस निरीक्षक बडे यांना संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.