डोंबिवली : कल्याण पूर्वेकडे असलेल्या महावितरणच्या नेतिवली शाखेतील अधिकाऱ्यांनी कल्याणातील चिंचपाडा आणि डोंबिवलीतील दावडी भागातील घरांची तपासणी केली असता यावेळी परिसरातील तीन घरांमध्ये विनामीटर चोरून वीज वापरली जात असल्याचे महावितरण अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. अधिकाऱ्यांनी लाखो रूपयांची वीज चोरी करणाऱ्या दोन वीज ग्राहकांविरुध्द महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी विद्युत चोरी कायद्याने गुन्हे दाखल केले आहेत. कल्याण पूर्वेतील चिंचपाडा रोडला असलेल्या नांदिवली येथील जगन्नाथ धनावडे यांनी ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत १४५८ युनिटची ३२ हजार ६५० रुपयांची वीज चोरी केल्याची तक्रार महावितरण अधिकाऱ्याने पोलिस ठाण्यात केली आहे. दुसऱ्या एका प्रकरणात दावडी येथील विमलेश शर्मा यांनी ३२ हजार ९४० रूपयांची गेल्या वर्षभरात, तर याच गावातील हितेश पाटील यांनी गेल्या वर्षभरात ६९ हजार ६६० रूपयांची वीज चोरी केल्याची तक्रार अधिकाऱ्यांनी दाखल केली आहे.
महावितरणच्या नेतिवली शाखेचे सहाय्यक अभियंता वैभव कांबळे यांनी पोलिस ठाण्यातील दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे, सप्टेंबरमध्ये आपण सहकाऱ्यांसह नांदिवली भागात वीज मीटर तपासणीसाठी गेलो होतो. तेव्हा जगन्नाथ धनावडे यांच्या घराची तपासणी करत असताना तेथे विनामीटर वीज वापर सुरू असल्याचे आढळले. त्यांच्या घरात लघुदाब वीज वाहिनीवरून काळ्या वायरच्या साह्याने आकडा टाकून वीज वापर सुरू असल्याचे आढळून आले. महावितरणचे आर्थिक नुकसान केल्याने त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालू महिन्यात वीज मीटर तपासणी मोहिमेत दावडी गावातील हितेश पाटील आणि विमलेश शर्मा यांनी विनामीटर घरात महावितरणच्या लघुदाब वीज वाहिनीवरून वीज पुरवठा घेतला असल्याचे महावितरण अधिकाऱ्यांच्या तपासणीत उघड झाले होते. त्यामुळे त्यांच्या विरुध्द महावितरणचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या वीज ग्राहकांनी वीज देयक भरण्याची हमी दिल्याने आणि कार्यालयीन कामामुळे तक्रार दाखल करण्यास विलंब झाल्याचे अभियंता वैभव कांबळे यांनी तक्रारीत म्हटले आहे.