मुंबई प्रतिनिधी : दिवाळीला गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या खिशाला कात्री बसणार होती, मात्र महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं एसटी प्रवाशांची दिवाळी गोड करण्याचा निर्णय घेतला आहे. आधी 10 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, जो आता रद्द करण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून दरवर्षी दिवाळीच्या काळात तात्पुरती भाडेवाढ लागू केली जाते. त्यानुसार, यंदा सर्व बस सेवांवर 24 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर या महिनाभरासाठी 10 टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला होता. त्यामुळे दिवाळीसाठी गावी जाणाऱ्या आणि नंतर घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना याचा फटका बसण्याची शक्यता होती. परंतु आता मात्र प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय. यंदाच्या उत्सवात कोणत्याही एसटी गाड्यांमधून जादा तिकीट भाडं आकारण्यात येणार नाहीये. याबाबतचे आदेश एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाचे महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी काढले आहेत.
दिवाळीनिमित्त शाळांना सुट्ट्या असतात, त्यामुळे मुलं मामाच्या गावी हमखास जातात. यंदा 24, 25 ऑक्टोबरपासून शाळांची दिवाळी सुट्टी सुरू होणार आहे. त्यामुळे गावाला जाणाऱ्या प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात आरक्षण केलंय. 2 महिन्यांआधीच रेल्वे गाड्यांचे तिकीट फुल्ल झाले. तसंच खासगी बसचं तिकीट खिशाला परवडत नसल्यानं दिवाळीत एसटीनं प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असते. त्याचबरोबर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना 50%, तर 75 वर्षांवरील वृद्धांना मोफत प्रवासाची सवलत असल्यानं एसटी प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे महसूल वाढीच्या दृष्टीनं एसटी महामंडळानं परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. ही भाडेवाढ 25 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून सुरू होणार होती. दरम्यान, दिवाळीसाठी एसटी महामंडळानं एमएसआरटीसीच्या वेबसाइटवर आधीच ऑनलाइन तिकीट बुकिंग सेवा सुरू केली आहे. त्यानुसार, अनेक प्रवाशांनी आगाऊ तिकीट आरक्षण केलंय. आरक्षण केलेल्या प्रवाशांनाही 25 ऑक्टोबरपासून तिकिटांची वाढीव रक्कम द्यावी लागणार होती. परंतु प्रवाशांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.