नवी दिल्ली प्रतिनिधी : राज्यातील विधानसभा निवडणूकीची आज घोषणा होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आज दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणूकीचे वेळापत्रक जाहीर करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणुका नोव्हेंबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. यासोबतच आज यूपी पोटनिवडणुकीची तारीखही जाहीर होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र सरकारचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपणार :
महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपणार आहे. चतर झारखंडमध्ये 29 डिसेंबरला सरकारचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे आता आगामी महिनाभरात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. या निवडणूकीत प्रमुख लढत ही महाविकास आघाडी आणि महायुतीत होणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार 26 नोव्हेंबरला महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.
दिवाळी लक्षात घेऊन तारखा जाहीर होणार :
निवडणूक आयोग दिवाळी लक्षात घेऊन तारखा जाहीर करणार आहे. दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर पर्यंत आहे आणि झारखंडमध्ये छठ पूजा साजरी केली जाते. या काळात महाराष्ट्रात काम करणारे बिहारी मतदार घरी जातात. या सर्व मतदारांचा विचार करता निवडणूक आयोग नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटी निवडणुका घेण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र आणि झारखंड या दोन्ही राज्यांतील राजकीय वातावरण सध्या तापले आहे. या निवडणुकीचा राज्यांव्यतिरिक्त राष्ट्रीय राजकारणावरही परिणाम होणार आहे. महाराष्ट्रात सध्या शिवसेनेच्या नेतृत्वाखालील एकनाथ शिंदे यांचे सरकार आहे. शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड करून भाजपशी हातमिळवणी करून राज्यात सरकार स्थापन केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित गटानेही या सरकारमध्ये भाग घेतला होता. त्यामुळे या निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदार सध्याच्या सरकारवर पुन्हा विश्वास ठेवणार की शिवसेना (उद्धव गट), राष्ट्रवादी (शरद गट) आणि काँग्रेस यांना सरकार स्थापन करण्याची संधी देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.