ठाणे : ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत माजिवडा जंक्शन येथे असलेल्या मुख्य जलवाहिनीत मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती झाल्याचे समोर आले आहे. ही गळती रोखण्यासाठी तसेच भविष्यातील संभाव्य अडचणी टाळण्यासाठी महापालिकेकडून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या दुरुस्तीच्या कामासाठी शनिवार, दि. ११ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजल्यापासून ते रविवार, दि. १२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत म्हणजेच तब्बल २४ तास ठाणे शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.
या शटडाऊन कालावधीत ठाणे महापालिकेअंतर्गत येणाऱ्या विविध भागांमध्ये पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. यात प्रामुख्याने मुंब्रा, खारेगाव, कळवा, साकेत कॉम्प्लेक्स, महागिरी, खारटन रोड, सिडको बसस्टॉप परिसर, कोपरी कोळीवाडा, पंचगंगा, राबोडी क्रमांक १ व २, आकाशगंगा, बाळकुम, लोढा अमारा, ब्रह्मांड, गोकुळनगर, आझादनगर, लोकमान्य नगर, इंदिरानगर, सावरकर नगर, साठेनगर, आंबेवाडी, डवलेनगर, रामनगर, कैलासनगर, जुना गाव, किसननगर, भटवाडी, श्रीनगर, शांतीनगर, रुपादेवी पाडा, ज्ञानेश्वरनगर परिसर, किसननगर ३ परिसर, पोलिस लाईन, खारकर आळी, वृंदावन, श्रीरंग, विकास कॉम्प्लेक्स, आंबेडकरनगर, गांधीनगर, सुभाषनगर, नळपाडा, वसंत विहार, लोकपुरम, लोकउपवन, देवदयानगर परिसर, कोकणी पाडा, शिवाईनगर, गावंडबाग, नीळकंठ, शास्त्रीनगर क्र. १ व २, लक्ष्मीबाग, विहंग पार्क, मैत्री पार्क, सिद्धांचल कॉम्प्लेक्स, वसंत विहार म्हाडा, माजिवडा, मानपाडा, कोठारी कंपाऊंड, ढोकाळी, मनोरमानगर, रुणवाल, डोंगरपाडा, विजयनगर, विजय पार्क, वाघबीळ, आनंदनगर, कासार वडवली, वर्तकनगर परिसर, चिरागनगर, दोस्ती कॉम्प्लेक्स तसेच वागळे एमआयडीसी परिसराचा समावेश आहे. महापालिकेने नागरिकांना या कालावधीत आवश्यक तेवढे पाणी आधीच साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करण्याची विनंती करण्यात आली आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीच्या काही तासांत कमी दाबाने किंवा उशिरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिकेकडून या कामासाठी सर्व आवश्यक यंत्रणा आणि मनुष्यबळ तैनात करण्यात आले असून काम वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

