मुंबई : महाराष्ट्रातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर आणि बनावट औषध विक्रेत्यांवर प्रभावी कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित अत्याधुनिक ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली सुरू केली आहे. प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या नव्या सुविधेची घोषणा करताना सांगितले की, नागरिकांना आता घरबसल्या अन्नातील भेसळ, निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ, बनावट औषधे किंवा औषधांच्या गुणवत्तेबाबत सहजपणे तक्रार नोंदवता येणार आहे. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी complaints.mahafda.in हे स्वतंत्र अधिकृत पोर्टल सुरू करण्यात आले असून, अन्न सुरक्षा आणि औषध गुणवत्ता या दोन्ही क्षेत्रांतील तक्रारी एकाच व्यासपीठावर स्वीकारल्या जाणार आहेत. नागरिकांना कायदेशीर प्रक्रियेची अडचण येऊ नये यासाठी प्रणाली मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. तक्रारदाराने स्वतःच्या भाषेत नोंदविलेली माहिती एआय प्रणालीद्वारे विश्लेषित केली जाईल. त्यानंतर संबंधित तक्रारीचे स्पष्ट आणि कायदेशीर स्वरूपातील मसुद्यात रूपांतर करून ती योग्य विभागाकडे तातडीने पाठवली जाईल. तसेच, तक्रार दाखल केल्यानंतर तिची स्थिती आणि प्रशासनाकडून झालेली कारवाई ऑनलाइन पद्धतीने ट्रॅक करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या डिजिटल प्रणालीचा मुख्य उद्देश अन्न व औषध क्षेत्रातील देखरेख अधिक प्रभावी करणे, तक्रार निवारण प्रक्रियेत पारदर्शकता वाढवणे आणि नागरिकांच्या तक्रारींवर जलद निर्णय घेणे हा आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले की, नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, दुकान किंवा संस्थेची गय केली जाणार नाही. नागरिकांकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे संबंधित ठिकाणी तपासणी करून आवश्यकतेनुसार धाड टाकण्यात येईल आणि कायद्याप्रमाणे कठोर कारवाई केली जाईल. समाजात कुठेही भेसळयुक्त अन्नपदार्थ, निकृष्ट दर्जाची उत्पादने किंवा बनावट औषधांची विक्री होत असल्यास नागरिकांनी ती बाब दुर्लक्षित न करता तत्काळ या पोर्टलद्वारे तक्रार नोंदवावी, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. आधुनिक एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने नागरिकांचा सहभाग वाढवून अन्न व औषध क्षेत्र अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह बनवण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

