मुंबई : सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर थुंकणे आणि कचरा टाकण्याच्या वाढत्या प्रकारांवर मुंबई उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करत महापालिकेला कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. सुनावणीदरम्यान न्यायालयाने, “उघड्यावर थुंकणे हा आता लोकांचा राष्ट्रीय छंद बनला आहे,” असे निरीक्षण नोंदवत शहरातील अस्वच्छतेबाबत चिंता व्यक्त केली. या समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांना थेट निर्देश देत रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करताना संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांची वैयक्तिक जबाबदारी निश्चित करण्यास सांगितले. तसेच केवळ नागरिकांवर दोषारोप न करता प्रशासकीय यंत्रणेतही उत्तरदायित्व निश्चित करण्याची गरज न्यायालयाने अधोरेखित केली. सार्वजनिक ठिकाणी कचरा आढळल्यास संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांवर प्रशासकीय आणि दंडात्मक कारवाई करण्याचा विचार करण्याचे निर्देश देण्यात आले. याशिवाय, सध्या उघड्यावर थुंकणाऱ्यांवर आकारला जाणारा २५० रुपयांचा दंड वाढवून तो २,००० रुपये करण्याबाबतही न्यायालयाने महत्त्वपूर्ण सूचना केली. अशा प्रकारच्या बेजबाबदार कृत्यांना आळा घालण्यासाठी दंड अधिक कठोर असणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
सुनावणीदरम्यान न्यायालयाने देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूर शहराचा आदर्श समोर ठेवत, तेथील वॉर्ड अधिकाऱ्यांच्या कार्यक्षम व्यवस्थापनाचा उल्लेख केला. मुंबई महानगरपालिकेकडे मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ, आर्थिक साधनसामग्री आणि पायाभूत सुविधा उपलब्ध असूनही शहरातील स्वच्छतेची अपेक्षित पातळी राखण्यात अपयश आल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. प्रशासनाकडे इच्छाशक्ती आणि प्रभावी अंमलबजावणीची तयारी असेल, तर मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या शहरात स्वच्छता राखणे कठीण नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. दरम्यान, बीएमसीच्या वतीने ज्येष्ठ वकील अनिल सखारे यांनी न्यायालयाला सांगितले की, महापालिका ‘म्युनिसिपल सॉलिड वेस्ट (मॅनेजमेंट अँड हँडलिंग) क्लीनलीनेस अँड सॅनिटेशन बाय-लॉज, २०२५’ या नव्या नियमावलीची कठोर अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे. या नियमांद्वारे शहरातील घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य अधिक प्रभावी करण्यावर भर दिला जाणार असून, न्यायालयाच्या निर्देशांनंतर स्वच्छता नियमांच्या अंमलबजावणीत आणखी कठोर भूमिका घेतली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
