नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील नेरुळ येथील पादचारी भुयारी मार्ग बंद आहेत. या पादचारी पुलाचा ताबा फेरीवाल्यांनी घेतला असून या ठिकाणी साहित्य ठेवले जात होते. महापालिकेने या फेरीवाल्यांवर कारवाई केली असून वापर नसलेल्या पादचारी भुयारी मार्गाला टाळे लावले आहे. सायन-पनवेल महामार्गाचे रुंदीकरणाचे काम करताना महामार्ग ओलांडणाऱ्या नागरिकांचे अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून नेरुळ परिसरात चार भुयारी मार्ग बांधण्यात आले होते. यामध्ये एलपी जंक्शन येथे २, एस.बी.आय.कॉलनी आणि उरण फाटा येथे प्रत्येकी एक भुयारी मार्ग बांधण्यात आले होते. परंतु या मार्गांचे काम अर्धवट असल्याने या भुयारी मार्गांचा नागरिकांना वापर करता येत नव्हता.
भुयारी मार्ग वापरात यावेत यासाठी २०१८ साली महापालिकेने या चारही भुयारी मार्गांच्या दुरुस्तीच्या कामासाठी पुढाकार घेत सुमारे ४३ लाख रुपये खर्च केले होते. यामध्ये भुयारी मार्गात साचणाऱ्या पाण्यासाठी विद्युत पंप बसविणे, भिंतींना प्लास्टर करणे, छतास पॉली कार्बोनेट शीट बसविणे, फ्लोरिंग, पायऱ्या तसेच भिंतींच्या टाइल्सची दुरुस्ती करणे, भुयारी मार्गाला जोडणाऱ्या पदपथांची कामे करणे, प्लम काँक्रीट करणे, रंगकाम करणे, माहिती फलक बसविणे, परिसराची स्वच्छता करणे आदी कामांचा समावेश होता. महापालिकेने काम केल्यावर देखील हे भुयारी मार्ग वापरात आले नाहीत. त्यानंतर यामधील साहित्याची देखील चोरी झाल्याचे प्रकार घडले होते. एलपी येथे नागरिकांची वर्दळ असली तरी शॉर्टकट मारण्यासाठी नागरिक रस्ते ओलांडणे पसंत करतात. तसेच एसबीआय कॉलनी आणि उरण फाटा येथे नागरिकांची वर्दळ नसल्याने या ठिकाणचे भुयारी मार्ग देखील ओस पडले होते. त्यानंतर या भुयारी मार्गांचा ताबा मद्यपी आणि गर्दुल्यांनी घेतला होता. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेने या भुयारी मार्गाला टाळे बसविले होते. नेरुळ एलपी येथील भुयारी मार्गाचे टाळे तोडून काही फेरीवाले या जागेचा वापर साहित्य ठेवण्यासाठी करत असल्याने महापालिकेने या भुयारी मार्गाला पुन्हा टाळे बसविले आहे.