पुणे : घरगुती वापरासाठी लागणाऱ्या गॅस सिलिंडरचे दर दिवसागणिक वाढत असताना, दुसरीकडे याच घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरु आहे. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्यावर कारवाई करुन तीन लाख २० हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास बिजलीनगर केली. याप्रकरणी मुकेश सुरेश पवार (वय २४ रा. बिजलीनगर) या दुकान चालकावर आयपीसी २८५, २८६ सह जिवनावश्यक वस्तुंचा कायदा १९५५ चे कलम ३, ७ सह स्फोटक पदार्थ अधिनियम सन १९०८ चे कलम ५ नुसार गुन्हा दाखल गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई सदानंद रुद्राक्षे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुकेश पवार हा बिजलीनगर झोपडपट्टी बस स्टॉपजवळ मल्हार गॅस सर्विस व होम अप्लायंसेस नावाचे दुकान चालवतो. त्याच्याकडे कोणतीही परवानगी नसताना घरगुती वापराचे भरलेले गॅस सिलिंडर मधून रिफीलच्या सहाय्याने अवैधरित्या लहान सिलिंडरमध्ये गॅस भरून त्याची चढ्या दराने विक्री करत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.
याबाबत माहिती मिळताच अंमली पदार्थ विरोधी पथकाने छपा टाकून ३ लाख २० हजार ११०. रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये २९ घरगुती वापराचे सिलिंडर, ३ व्यावसायिक व ७२ लहान गॅस सिलिंडर, टेम्पो, रिफिलींग करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे. आरोपी बेकायदेशीररित्या कोणत्याही परवानगी शिवाय व कोणत्याही सुरक्षितते शिवाय भरलेल्या सिलेंडर मधील गॅस रिकाम्या गॅस टाकीमध्ये भरत होता. यावेळी जिवीतास धोका होण्याची शक्यता असताना देखील आरोपी हा बेकायदेशीर कृत्य करत होता. पुढील तपास पोलीस करीत आहेत.